दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे. यासाठी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त गांजाची झाडं लावण्याचा प्रकार समोर आला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गांजाची झाडे लावल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर केरळमधील उत्पादन शुल्क विभागाने आता तपास सुरु केला आहे. कोल्लम जिल्ह्यातील मंगडजवळ कुरीशडी जंक्शन ते बायपास रोडकडे जाणाऱ्या परिसरात ही झाडे लावण्यात आली आहेत.

शनिवारी झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानंतरच ही झाडे तिथे लावण्यात आली होती. स्थानिकांना या विषयी संशय आल्यानंतर त्यांनी माहिती अधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. उत्पादन शुल्क विशेष पथकाचे सर्कल इन्स्पेक्टर टी. राजीव आणि त्यांच्या पथकाने पुढील तपास सुरु केला. मात्र अधिकाऱ्यांच्या येण्याआधीच ती झाडे काढून टाकण्यात आली.

फोटो व्हायरल झाल्यानंतर माहिती आली समोर

गाजांच्या झाडांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला होता. फोटोंमध्ये या ठिकाणी ३० ते ६० सेटींमीटर उंचीची झाडे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान या प्रकरणी कांडाचिरा येथील एका व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही त्या व्यक्तीवर गांजाच्या तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी बायपास पुलाखाली भागामध्ये शोध मोहीम सुरू केली होती. परंतु त्याआधीच घटनास्थळावरुन झाडे काढून टाकण्यात आली.

गांजा वाचवू शकतो करोना रुग्णांचे प्राण; संशोधकांचा दावा

याप्रकरणी उत्पादन शुल्क प्रतिबंधक अधिकारी एम. मनोज लाल, निर्मलन थांपी, बिनुलाल नागरी उत्पादन शुल्क अधिकारी गोपाकुमार, श्रीनाथ, अनिलकुमार, ज्युलियन क्रूझ आणि चालक नितीन यांच्या पथकाने तपास सुरू केला.

भारतात गांजाच्या लागवडीवर बंदी

भारतात गांजाच्या लागवडीवर बंदी घालण्यात आली आहे. १९८५ मध्ये भारत सरकारने नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गांजाच्या लागवडीवर बंदी घातली होती. परंतु या कायद्याने राज्य सरकारला औद्योगिक  कारणांसाठी गांजाची नियमन करुन लागवड करण्यास परवानगी दिली आहे. या वनस्पतीचा प्रामुख्याने चरस आणि गांजा तयार करण्यासाठी वापर केला जातो. वनस्पतीपासून वेगळे केलेल्या राळेचा वापर हिशिशच्या तेलाच्या निर्मितीसाठी केला जातो. अन्य भागांचा वापर नशा करण्यासाठी  केला जातो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.