करोना विषाणूंच्या फैलाव होत असल्याने जगभरामध्ये भितीचे वातावरण आहे. करोनाची बाधा झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या साडेसहा हजारहून अधिक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील वेगवगेळ्या देशांमध्ये अनेक सार्वजनिक सेवा बंद करुन संपूर्ण शहरे लॉक डाऊन करण्यात आली आहेत. अमेरिकेमधील अनेक शहरांमध्ये नागरिकांनी स्वत:च सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक गोष्टी अनिश्चित काळासाठी बंद करण्याता आल्या आहेत. शिकागोमध्येही अशाच प्रकारे बंद करण्यात आलेल्या एका मत्स्यालयातील व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शिकागोमधील शेड मत्सालयामधील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मस्त्यालयाच्या लॉबीमध्ये चक्क पेंग्विन पक्षी फेरफटका मारताना दिसत आहेत. सामान्यपणे पर्यटकांची गर्दी असणाऱ्या या मत्स्यालयामध्ये पेंग्विनच मासे बघत फिरताना दिसत आङेत. याबद्दल मत्स्यालयाच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलं आहे. “काही पेंग्विन मत्स्यालयातील इतर प्राण्यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. वेलिंग्टनला अमेझॉन रायझिंग सेक्शनमधील माश्यांमध्ये अधिक रस असल्याचे दिसत आहे,” असं कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आलं आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, “आज सकाळी एडवर्ड आणि अनी या दोघांनी मत्स्यालयामध्ये फेरफटका मारला. ते रॉपहॉकर प्रकारचे पेंग्विन आहेत. म्हणजेच ते प्रजननासाठी एकत्र आले आहेत. वसंत ऋतू हा पेंग्विनसाठी प्रजननाचा काळ असतो. यावर्षीही त्यात काहीच फरक पडलेला नाही. आपल्यासाठी काळ जरा कठीण असेल पण या पेंग्विनसाठी हे दिवस खास आहेत. या दिवसांमध्ये मिळालेली संधी साधून त्यांना भटकता यावे यासाठी आम्ही मत्स्यालयामध्ये वेगवेगळे प्रयत्न करत आहोत,” असं मत्स्यालयाने म्हटलं आहे.

मत्स्यालयामध्ये भटकणाऱ्या पेंग्विनची नावे, अनी, एडवर्ड आणि विलिग्टन अशी आहेत. “मत्स्यालय रिकामे असल्याने पेंग्विनबरोबर आम्ही वेगवेगळे प्रयोग करत आहोत. त्यांना नौसर्गिक वातावरण मिळावे आणि मुक्तपणे भटकता यावे असे प्रयत्न कर्मचारी करत आहेत,” असं मत्स्यालय प्रशासनाने ‘द शिकागो ट्रेब्युन’शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

इलिनॉयमध्ये करोनाचे १०० रुग्ण अढळून आल्याने शहरामधील अनेक सार्वजनिक ठाकाणे बंद करण्यात आली आहेत.