तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? मग तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. रिलायन्स जिओचे रिचार्ज करणाऱ्यांना आता रिचार्जवर कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. रिलायन्स बाजारात आपले स्थान अग्रेसर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतानाच कंपनीची ही नवीन ऑफर ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडेल, अशी आशा आहे.

सध्या बहुतांश ग्राहक ऑनलाईन रिचार्ज करताना दिसतात. असे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना कंपनीने विशेष सवलत जाहीर केली आहे. विविध प्रकारच्या ई-वॉलेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर ग्राहकांना ३०० रुपयांच्या वरील किंमतीच्या रिचार्जवर मिळणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पेटीएम या डिजिटल पेमेंट सर्व्हिसकडून ग्राहकांना ३००हून अधिक रुपयांच्या रिचार्जवर ७६ रुपयांची सवलत मिळणार आहे. ग्राहकांना कॅशबॅक ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी PAYTMJIO या प्रोमो कोडचा वापर करायचा आहे. रिचार्ज केल्यानंतर २४ तासांत ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकेल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

याशिवाय अॅमेझॉनवर पहिल्यांदाच जिओचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ९९ रुपये कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा लाभ ग्राहकांना १९ ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. ग्राहकांच्या अॅमेझॉन पे अकाऊंटवर पुढील ७ दिवसांत ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. फ्लिपकार्टच्या फोनपे या अॅप्लिकेशनवरुन रिलायन्स जिओचे रिचार्ज केल्यास ग्राहकांना ७५ रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर २१ ऑगस्टपर्यंत असून, ३०९ हून अधिक रुपयांच्या रिचार्जवर ही ऑफर मिळणार आहे. ग्राहकांना ही कॅशबॅक फोनपेच्या अकाऊंटवर मिळणार आहे.

नुकतेच जुलैमध्ये रिलायन्स जिओने २ नवीन टेरीफ प्लॅन बाजारात आणले. धन धना धन ऑफरच्या अंतर्गत ३९९ आणि ३४९ रुपयांचे हे प्लॅन्स कंपनीने जाहीर केले. यातील ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी रोज एक जीबी इंटरनेट डेटा मोफत देण्यात येत आहे. तर ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० जीबी डेटा ५६ दिवसांसाठी देण्यात आला आहे.