फॅशन शो म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कॅटवॉक. मांजरीची चालायची लकब ही अतिशय डौलदार असल्याने तिच्यासारखे चालता येणे यात कसब लागते. फॅशन शोमध्ये सहभागी होणाऱ्या मॉडेलकडे हे कसब असते. त्यावरुनच त्यांची खरी परीक्षा होते. वेगवेगळ्या ब्रँडच्या कपड्यांसाठी, पादत्राणांसाठी आणि दागिन्यांसाठी या फॅशन शोचे आयोजन केले जाते. आता फॅशन शोच्या व्यासपीठावर रॅम्पवॉक करण्यासाठी एकामागे एक मॉडेल्स येतात हे आपल्याला माहित आहे. पण यामध्ये चक्क एका मांजरीनेही सहभाग घेतल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. तुर्कीमध्ये एस्मोड आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये ही दुर्मिळ घटना पाहायला मिळाली. इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये मांजर आल्यानंतर शोमध्ये काहीतरी व्यत्यय येईल असे वाटले होते मात्र तसे न होता. रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्स यामुळे थांबतील असे वाटले होते. मात्र तसे न होता त्यांनी आपला वॉक नेहमीप्रमाणे सुरुच ठेवला.

विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडियो शेअरही करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. सुरुवातीला ही मांजर एका ठिकाणी बसून आपली शेपटी आणि पाय तोंडाने खाजवत होती. मग एक मॉडेल परतत असताना तिने तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. मात्र त्यानंतर ही मांजर प्रत्यक्ष मॉडेलप्रमाणे रॅम्पवरुन चालत पुढे गेली. या गोष्टीमुळे फॅशन शोला उपस्थित असणाऱ्या लोकांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. तसेच त्यांच्यात मांजरीला रॅम्पवॉकवर पाहून एकच हशा पिकल्याचेही व्हिडियोमध्ये समजत आहे. मात्र या अनोख्या अशा घटनेमुळे उपस्थितांना कॅटवॉक म्हणजे नेमके काय याचेच दर्शन घडले असे म्हणायला हरकत नाही. या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाइक्स आले असून अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत.