लग्नसमारंभामध्ये अतिउत्साह दाखवला की कसा अंगाशी येतो याचा प्रत्यय उत्तर प्रदेशमधल्या चित्रकूट येथे आला आहे. उत्तर प्रदेशातल्या चित्रकूटमधील सुरसेन गावामध्ये एका तरूणाचं लग्न होतं. काल सोमवारी संध्याकाळी लग्नसमारंभाता एक भाग म्हणून परंपरेनुसार चिलक समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सत्येंद्र असं या विवाह होणार असलेल्या तरूणाचं नाव आहे. सत्येंद्रच्या विवाह समारंभातला एक विधी असलेल्या तिलक कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सत्येंद्रचे नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या अंगात अतिउत्साह संचारला. काही जणांनी तर खिशातून पिस्तूल काढले आणि हवेत गोळीबार करत विवाह समारंभाचा आनंद लुटायचा प्रयत्न केला.

परंतु, हा सगळा आततायी उत्साहीपणा, जल्लोष नी गोळीबार आपल्या घरातून बघत असलेल्या एका महिलेच्या जीवावर बेतला. एका पिस्तुलातून हवेत मारलेली गोळी एका महिलेच्या मानेत घुसली. ही महिला बाजुलाच राहत होती. हा समारंभ नीट बघता यावा म्हणून ती घराच्या छतावर गेली होती व कार्यक्रमाचा मजा लुटत होती. परंतु मजा म्हणून गोळीबार करण्याच्या या उत्साहानं या महिलेचा मात्र हकनाक बली घेतला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बलवंत चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत. शल्यचिकित्सा करून महिलेचे शव अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अतिउत्साह दाखवत गोळीबार करणारे कोण होते, याची ओळख पटवण्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.