श्रीनिवासन गौडा हे नाव सध्या भारतात सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. कर्नाटकात खेळवल्या जाणाऱ्या कंबाला या पारंपरिक स्पर्धेत श्रीनिवासनने बैलांच्या जोडीसोबत धावताना १०० मी. चं अंतर अवघ्या ९.५५ सेकंदात पूर्ण केलं. या दरम्यान श्रीनिवासनने Fastest Man on Earth हा किताब मिळवलेल्या उसेन बोल्टचाही विक्रम मोडला.

सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही श्रीनिवासनच्या कामगिरीची दखल घेत, क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना श्रीनिवासनच्या कामगिरीची दखल घेण्याचा सल्ला दिला. त्याच्यात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असल्याचंही महिंद्रा म्हणाले…

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही महिंद्रा यांच्या ट्विटची दखल घेत, ‘साई’ (Sports Authority of India) च्या माध्यमातून श्रीनिवासनला योग्य प्रशिक्षण दिलं जाईल याची खात्री दिली.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनही श्रीनिवासनच्या कामगिरीचं कौतुक होतं आहे. त्यामुळे भविष्यकाळात श्रीनिवासन ‘साई’ मधील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसा सराव करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.