अगदी सकाळपर्यंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नक्की कोण होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. गेल्या महिन्याभरापासून अनेक राजकिय विश्लेषक, अभ्यासक याबद्दल आपली मत नोंदवत होते. अमेरिकेतल्या तर अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राने ट्रम्प यांच्याविरोधात पाऊले उचलली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन विराजमान होतील अशी चिन्हे दिसत होती. तर निवडणुकांआधीच भविष्यवेत्त्याकडूनही भाकिते जाणून घेण्याचे प्रयत्न वारंवार सुरू होते. अशातच चेन्नईतल्या चाणक्य माशाने ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी केली. पण ही भविष्यवाणी फारशी गांभीर्याने घेतली गेली नव्हती पण आता ट्रम्प यांच्या विजयाने  हा भविष्य सांगणारा मासा चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कप सामन्याच्या दरम्यान या माशाने दोनदा अचूक भविष्य वर्तवले होते. २०१५ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात पोहचेल असे भविष्य त्याने वर्तवले होते तेही अगदी अचूक ठरले होते. आपल्या अचूक भविष्यवाणीने हा मासा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आता भविष्य बघायचे असल्यास चाणक्यकडे जायला पाहिजे अशा विनोदी चर्चा रंगल्या आहेत.