चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरबद्दल आज ठोस माहिती मिळण्याची शक्यता आहे. चंद्रावर विक्रमने ज्या ठिकाणी लँडिंग केले तिथून आज अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाचा ऑर्बिटर जाणार आहे. १० दिवसांपासून इस्रोच्या वैज्ञानिकांनी वारंवार प्रयत्न करुनही विक्रम बरोबर संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. ७ सप्टेंबरला विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते.

पण अखेरच्या टप्प्यामध्ये विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. विक्रम ज्या ठिकाणी आहे तिथून ऑर्बिटर आज जाणार असल्याच्या वृत्ताला नासाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. नासाच्या ऑर्बिटरकडून मिळणाऱ्या फोटोंमधून विक्रमचे भवितव्य समजू शकते. नासाच्या जेपीएल प्रयोगशाळेच्या ७० मीटर अँटेनाच्या सहाय्याने सुद्धा विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. विक्रम बरोबर संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्याचा थंडावा असतो. त्या वातावरणात लँडर, रोव्हर काम करण्याची शक्यता नाही. पृथ्वीरचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लँडर, रोव्हरची रचना १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

अमेरिकेने कधी पाठवला होता ऑर्बिटर
नासाच्या या (एलआरओ) चंद्र मिशनची सुरुवात १८ जून २००९ साली झाली होती. अॅटलस व्ही रॉकेटने ऑर्बिटरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पाच दिवसांनी २३ जूनला नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.

१५ सप्टेंबर २००९ ला ऑर्बिटरने आपले शोध कार्य सुरु केले. चंद्रावर खनिज असलेल्या साधन संपत्तीच्या जागा, अनुकूल प्रदेश, भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमांसाठी अनुकूल पर्यावरण याविषयी माहिती गोळा करण्यात आली. १५ सप्टेंबर २०१० रोजी बरोबर एकावर्षाची एलआरओचे मिशन पूर्ण झाले. एलआरओमध्ये हाय रेसोल्युशनचा कॅमेरा बसवलेला आहे. ४० वर्षापूर्वीच्या अपोलो मिशनमधील चंद्रावरील मानवी पाऊल खूणा आपल्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद केल्या आहेत. नासाच्या ऑर्बिटरने चीनच्या चँग ३ आणि चँग ४ लँडरचे तसेच काही महिन्यांपूर्वी चंद्रावर क्रॅश लँडिंग केलेल्या इस्रायलच्या बेरेशीटचे सुद्धा फोटो काढले आहेत.