चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर व्यवस्थित काम करत आहे. पण विक्रम लँडरबरोबर संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के.सिवन यांनी गुरुवारी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरची समिती शेवटच्या टप्प्यात लँडरबरोबर नेमकं काय चुकीचं घडलं त्याचं विश्लेषण करत आहे. समितीने आपला अहवाल सोपवल्यानंतर अवकाश संस्था भविष्यातील योजनांवर काम सुरु करेल असे सिवन यांनी सांगितले.

चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असून सर्व पेलोडसनी आपले कार्य सुरु केले आहे असे सिवन यांनी सांगितले. ७ सप्टेंबला विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होते. पण शेवटच्या टप्प्यामध्ये इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर पुढचे १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.

विक्रम लँडर आणि त्यात असलेल्या रोव्हरचे आयुष्य १४ दिवसांचे होते. त्यामुळे २१ सप्टेंबरला चंद्रावर रात्र सुरु झाल्यानंतर संपर्काच्या सर्व आशा मावळल्या. चंद्रावर रात्रीच्या वातावरणात ही उपकरणे तग धरु शकत नाही. तशी त्यांची रचना करण्यात आली नव्हती. मोहिमेची ९८ टक्के उद्दिष्टये पूर्ण झाली आहे असे सिवन यांनी शनिवारी सांगितले. भारताचे पुढचे लक्ष्य मिशन गगनयान आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत माणसाला अवकाशात पाठवण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

नेमकं काय चुकलं
नेमकं त्यावेळी काय चुकलं याबद्दल इस्रोच्या एका माजी वैज्ञानिकाने खुलासा केला आहे. स्पेस टेक्नॉलॉजी खूप किचकट आहे. ती शक्य तितकी सोपी ठेवावी. त्यात आणखी गुंतागुंत वाढवू नये. जे विक्रमच्या बाबतीत झाले. उदाहरणार्थ चार इंजिनचे कार्य एकसूरात एकाचपद्धतीने सुरु ठेवणे तांत्रिक दृष्टया आव्हानात्मक होते. त्यात मध्यभागी पाचवे इंजिन बसवण्यात आले.

इस्रोच्या या माजी वैज्ञानिकाच्या मतानुसार चांद्रयान-२ मोहिमेसाठी GSLV-Mk III रॉकेट उपलब्ध आहे हे आधी समजले असते तर लँडरमध्ये पाच इंजिनांऐवजी एकच शक्तीशाली इंजिन उपयुक्त ठरले असते. विक्रम सारख्या लँडरसाठी ३,५०० न्यूटॉनचे एकच इंजिन हवे होते. चार इंजिनांचे कार्य एकाच पद्धतीने सुरु ठेवण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या टाळता आल्या असत्या. जटिलता टाळता आली असती. अन्य देशांनी चंद्रावर आपले यान उतरवताना एकाच शक्तीशाली इंजिनचा वापर केला होता. एका इंजिनमुळे सॉफ्ट लँडिंग करणे शक्य झाले असते असा इस्रोच्या माजी वैज्ञानिकाने निष्कर्ष काढला आहे.