नासाच्या ऑर्बिटरला दुसऱ्या प्रयत्नातही विक्रम लँडरला शोधून काढता आलेले नाही. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर १४ ऑक्टोंबरला विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला. नासाच्या एलआरओने लँडिंग साइटच्या जागेचे वेगवेगळे फोटो काढले. पण त्यानंतरही विक्रम लँडरचा शोध लागू शकलेला नाही. ७ सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होते. पण अखेरच्या टप्प्यात लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकलेला नाही.

विक्रम लँडर सावल्यांखाली झाकला गेल्यामुळे त्याचे स्पष्ट फोटो मिळत नसावेत असे नासाचे म्हणणे आहे. यापूर्वी १७ सप्टेंबरला एलआरओ ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेला होता. १७ सप्टेंबरला संधी प्रकाशाची वेळ असल्याने विक्रमच्या लँडिंग साइटचे स्पष्ट फोटो मिळू शकले नव्हते. त्यामुळे १४ ऑक्टोंबरला अपेक्षा होती. पण यावेळी सुद्धा ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत. १७ सप्टेंबरला चंद्रावर अंधार पडण्याची वेळ असल्याने सावलीमुळे विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळू शकला नव्हता.

आता १० नोव्हेंबरला नासाचा ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन जाणार आहे. विक्रमचे लँडिंग फसले तरी चांद्रयान-२ मोहिम संपलेली नाही हे इस्रोने आधीच स्पष्ट केले होते. कारण ऑर्बिटर चंद्रापासून १०० किमीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. पुढची साडेसातवर्ष ऑर्बिटरचे चंद्रावरील शोधकार्य सुरु राहणार आहे. विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रग्यान रोव्हर होता. विक्रम लँडर आणि रोव्हरची रचना १४ दिवसांच्या हिशोबाने करण्यात आली होती. कारण चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या चौदा दिवसांसमान असतो. रात्रीच्या वेळी चंद्रावर कडाक्याचा थंडावा असतो. अशा वातावरणात ही उपकरणे तग धरण्याची शक्यता नव्हती.

असा दिसतो प्रकाशमान चंद्र
मागच्या आठवडयात चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरमधील स्पेक्ट्रोस्कोपिक उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाचा प्रकाशमान फोटो काढला आहे. चंद्रावरील खनिज आणि चंद्राची रचना समजून घेण्याच्या उद्देशाने हा फोटो काढण्यात आला आहे. या डाटामुळे चंद्राची उत्पति नेमकी कशी झाली ते समजून घेता येणार आहे. ऑर्बिटरमधील वेगवेगळया उपकरणांच्या मदतीने चंद्राचा अभ्यास सुरु झाला आहे. ऑर्बिटरमधील इमेजिंग इन्फ्रारेड स्पकट्रोमीटरने (IIRS) चंद्राच्या पृष्ठभागाचा पहिला प्रकाशमान फोटो पाठवला आहे. ऑर्बिटरने पाठवलेल्या या फोटोमध्ये चंद्रावरील खड्डे स्पष्टपणे दिसतात.