खादी ग्रामोद्योग आयोगाकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या कॅलेंडर आणि डायऱ्यांवर महात्मा गांधी यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी गांधीजींप्रमाणे मोठ्या चरख्यावर सूत कातताना दिसत आहेत. त्यामुळे ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. गेल्या अनेक पिढ्यांपासून खादी आणि चरख्यावर सूत कातणारे गांधींचे हे समीकरण लोकांच्या डोक्यात पक्के झाले होते. मात्र, आता नव्याने प्रकाशित आलेल्या कॅलेंडर्स आणि डायऱ्यांवर कुर्ता-पायजमा आणि कोट घातलेले नरेंद्र मोदी आधुनिक पद्धतीच्या चरख्यावर सूत कातताना दिसत आहेत त्यातून या कलेंडरच्या बाराही पानांवर मोदींचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. शुक्रवार सकाळपासून ट्विटरवर #चरखा_चोर_मोदी हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये दिसत आहेत.

वाचा : उषा किरण बनली नक्षलग्रस्त भागातील पहिली महिला CRPF अधिकारी

खादी ग्रामोद्योग आयोगाकडून कलेंडर प्रकाशित करण्यात आले. यातील १२ पानांवर फक्त आणि फक्त मोदीच दिसत आहेत. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून कॅलेंडर आणि डायऱ्या आवर्जून घेण्यात आल्या आहेत मात्र हा अनपेक्षित बदल पाहून सोशल मीडियावर आता नाराजी उमटत आहे. गुरूवारीच मुंबईतील विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले होते.
वाचा : गंगेच्या स्वच्छतेसाठी मुस्लिम बांधवांनी घेतला पुढाकार

गांधीजी आणि खादीचे अतूट नाते आहे. स्वदेशीची चळवळ उभारणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच खादीचा आग्रह धरला. या विचारांतून खादी आणि ग्रामोद्योगाचा देशभर प्रसार झाला. त्यातून अनेकांना मोदींचे छायाचित्र लावण्याचा विचार रूचलेला नाही. याबाबत खादी ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एक तातडीची सभा घेण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला आमचा आक्षेप नसून कॅलेंडरमधून गांधीजींचे छायाचित्र हटविण्यास आमचा विरोध आहे असेही सांगण्यात आले. गांधी आणि खादी हे अतुट नाते आहे. त्यामुळे खादी व ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरून त्यांचे छायाचित्र काढणे हा गांधीजींचा अपमान आहे. म्हणूनच आम्ही आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवत आहोत, असे कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने सांगितले होते. त्यातून विरोधकांनी देखील या कॅलेंडरवर आक्षेप घेतला आहे. अशातच सकाळपासून ट्विटरवर तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.