‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’मध्ये सहभागी होणं छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अंगाशी आलं आहे. या प्रकरणामुळे आता मोठा वाद निर्माण झाला असून, विरोधक देखील सरकारला धारेवर धरत आहे.

छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुराधा अग्रवाल या केबीसीमध्ये सहभागी झाल्या होत्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाकारली असल्याचे समोर आले आहे. भोपाळमध्ये ऑडिशन झाल्यानंतर अनुराधा अग्रवाल यांना कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मुंबईत बोलावण्यात आलं. अनुराधा दिव्यांग आहेत. त्यांच्या भावाला कॅन्सर झालाय. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना पैसे हवे होते. केबीसीत सहभागी होऊन जे पैसे मिळतील त्यातून भावावर उपचार करण्याचं त्याचं स्वप्न होतं. या स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर परवानगीसाठी अनुराधा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहिले होते. पण त्यांना सुरुवातीला उत्तर आले नाही. दुर्दैव म्हणजे ज्या दिवशी त्या मुंबईला जाणार होत्या, त्याच्या एक दिवस आधी त्यांच्या आईचं निधन झालं. पण नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्या मुंबईत केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या.

वाचा : धावता-धावता ‘तो’ प्रेमात पडला!, कृष्णवर्णीय मैत्रिणीला घातली लग्नाची मागणी

तिथे त्यांनी चांगली रक्कमही जिंकली. भावावर उपचार करण्याचं त्यांचं स्वप्नही पूर्ण झालं. पण जेव्हा त्या आपल्या घरी परतल्या, तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला. कारण कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी त्यांना वरिष्ठांकडून देण्यातच आली नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांना पाठवला. तेव्हा त्यांनी अनुराधाला परवानगी नाकारली असल्याचं पत्र पाठवलं. विशेष म्हणजे अनुराधा केबीसीमधून परतल्यानंतर काही दिवसांनी त्यांना हे पत्र मिळालं.

अनुराधा यांना परवानगी नाकारल्यामुळे विरोधक आक्रमक झालेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचं असेल तर त्यांना लगेच परवानगी देण्यात येते. पण जर एखाद्या अधिकाऱ्याला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी चालून आली, तर त्यांना रोखण्यात येतं, असा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर या प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणाला राजकीय रंग चढल्यानं रमण सिंह यांनी पत्रात सुधारणा करून परवानगी दिली असल्याची औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत.

Viral Video : पितृपक्षात कावळ्याला बळजबरीने भरवला जातोय पिंड, सत्य मात्र वेगळंच