जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. येथे जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. अनेकदा जंगलातील हा थरार अनुभवायला पर्यटक जंगल सफारीला जातात. मात्र अशा सफारी दरम्यान एक छोटी चूक काळजाचा ठोका चुकवू शकतो. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

तर झालं असं की टांझानियातील गोल कोप्स सेरेन्गेटी नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारी दरम्यान पर्यटकांच्या काय समोर रस्त्यावरच एक चित्ता बसला होता. चित्त्याला पाहून अनेकजण फोटो काढण्यासाठी खिडकी आणि ओपन रुफमधून बाहेर आले.मात्र तितक्यात दुसरा चित्ता या गाडीच्या मागच्या दारातून आत शिरला.

चित्त्याला गाडीत बघताच पर्यटकांची भंबेरी उडाली. अनेकांनी आरडाओरडा सुरु केला.मात्र टूअर गाईडने चित्ता तुम्हाला काही करणार नाही असं सांगत पर्यटकांना शांत होण्याच्या सूचना केल्या. तसेच घाबरून न जाता आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला गाईडने दिला. असं केल्यास चित्त्याला आपल्यापासून भीती वाटणार नाही असं गाईड म्हणाला.

गाईडने सांगितल्याप्रमाणे खरोखरच काही वेळानंतर चित्ता खाली उतरुन निघून गेला. त्याने कोणत्याही पर्यटकावर हल्ला केला नाही अथवा कोणाला नुकसान पोहचवलं नाही. याच व्हिडीओमध्ये पुढे अन्य एक चित्ता गाडीच्या बोनेटवर बसल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक सिंह पर्यटकांच्या गाडीमध्ये शिरलेल्यानंतर उडालेला गोंधळ दिसत होता. या प्रकरणामध्येही सुदैवाने कोणीही जखमी झालं नव्हतं.