आपल्याला एखादा पदार्थ खायची इच्छा झाली की आपण मोबाईल हातात घेतो आणि लगेच ऑर्डर करतो. अशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने पदार्थ मागवणे वाटते तेवढे सोपे असले तरीही ते म्हणावे तितके सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चेन्नईमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरुन ही गोष्ट समोर आली आहे. दिनदयालन यांनी स्विगी या ऑनलाइन पोर्टलवरुन चिकन शेजवान चॉप्सी ऑर्डर केले होते. हा पदार्थ त्याने आपल्याच जवळच्या एका हॉटेलमधून मागवला होता. ऑर्डर केलेला पदार्थ आला आणि तो खाण्यास दिनदयालन यांनी सुरुवातही केली. मात्र अर्धे खाऊन झाल्यानंतर त्याला त्यामध्ये एक बँडेड आढळले. हे बँडेडही साधेसुधे नव्हते तर रक्ताने माखलेले होते.

दिनदयालन यांनी या घटनेनंतर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. फेसबुकवर त्याने लिहीलेल्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी संबंधित पदार्थ ज्या हॉटेलमधून आला त्या हॉटेलवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे दिनदयालन यांनी याबाबत हॉटेलकडे तक्रार करुनही त्यांनी आपल्या ऑर्डरची रिप्लेसमेंट देण्यास नकार दिला. याबाबत तक्रार केल्यावरही हॉटेलने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही असे तक्रार करणाऱ्या दिनदयालन यांनी सांगितले.

अशाप्रकारे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हँडग्लोवज न घालणे आणि हाताला दुखापत झाली असतानाही हॉटेलमध्ये काम करणे चुकीचे आहे. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हॉटेल आणि स्विगी या दोघांच्याही विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे दिनदयालन म्हणाले. अशाप्रकारची तक्रार करुनही हॉटेलमधील ऑर्डर घेतल्या जात असल्याची नोंद तक्रारदाराने केली आहे. तर दुसरीकडे स्विगीने याची घेतली असून अशाप्रकारे ग्राहकांच्या आरोग्याला हानी पोहोचत असेल तर ते निशअचितच निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असेही स्विगीने सांगितले आहे.