स्कॉटलंडमध्ये चक्क रस्ता ओलांडू पाहणा-या एका कोंबडीला पोलिसांनी ताब्यात घेतले. भररस्त्यात कोंबडीला पकडण्यासाठी धावणा-या या पोलिसांना पाहताच अनेकांनी सोशल मीडियावर ट्विट करत या हास्यास्पद प्रकाराचे वर्णन केले आहे. तर दुसरीकडे डाँडी पोलिसांनी देखील ट्विट करत आम्ही रस्ता ओलांडणा-या कोंबडीला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.
डाँडी येथल्या मार्केटगेटवर एक कोंबडी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवण्यास अडचणी येत असल्याची माहिती एकाने डाँडी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी लगेचच या ठिकाणी धाव घेत कोंबडीला पकडून तुरुंगात ठेवले. चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणा-या एका कोंबडीला देखील या देशात तुरूंगवास होऊ शकतो यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. खुद्द डाँडी पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरून कोंबडीला ताब्यात घेतले असल्याचे ट्विट आल्यानंतर ते ट्विट व्हायरल झाले.
इतकेच नाही तर या कोंबडीचा मालक जोपर्यंत पोलिस ठाण्यात हजर राहणार नाही तोपर्यंत ही कोंबडी आपल्या ताब्यात राहणार असल्याचे पोलिसांनी जाहिर केले. या ट्विटवर नेटीझन्सकडून हास्यास्पद प्रतिक्रिया येत आहे. ‘कोंबडीलाही वाहतुकीचे नियम लागू होतात की काय ?’ अशा स्वरुपाच्या प्रतिक्रियाही ट्विटरवर येत आहेत. पोलिसांचे हे ट्विट वाचल्यानंतर स्कॉटलंडमधल्या प्राणीप्रेमी संघटनेने येथल्या पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत या कोंबडीला आपल्या ताब्यात घेतले आहे. जोपर्यंत या कोंबडीचा मालक तिला न्यायला येत नाही तोपर्यंत आपण हिची काळजी घेऊ असेही या संघटनेने सांगितले आहे.