हिंदू धर्मात गाईला माता म्हणून संबोधले जातं हे सर्वांनाच माहिती आहे. पण याच भावनेनं उत्तर प्रदेशातील एका शेतकरी दाम्पत्याने गाईच्या वासराला आपला मुलगा म्हणून दत्तक घेतलं आहे. या दाम्पत्याच्या या मातृत्वाची सर्वत्र चर्चा आहे.

विजयपाल आणि राजेश्वरी देवी असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव असून लग्नाच्या १५ वर्षांनंतरही त्यांना मुल होऊ न शकल्याने त्यांनी गाईच्या एका वासरालाच आपला मुलगा म्हणून दत्तक घेतलं आहे. ही दत्तक प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी या दाम्पत्यानं वासराच्या मुंडन विधीचेही आयोजन केले होते. यावेळी त्यांनी त्याचे नामकरण ललतू बाबा असे केले.

गोमती नदीच्या ललतू घाटावर हा मुंडन सोहळा पार पडला. यावेळी हा विधी करणाऱ्या गुरुजींनी या वासराला आणि त्याच्या पालकांना आशिर्वाद दिले. या सोहळ्यासाठी ५०० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या पाहुण्यांसाठी भोजनाचा बेतही आखला होता. “ललतूला मी कायमच माझ्या मुलाप्रमाणे वागणूक देईल. जन्मापासूनच हे वासरु आमच्याशी जोडलं गेलं आहे. ललतूचं आमच्यासाठीचं प्रेम हे खरं आणि निरपेक्ष आहे,” असं यावेळी विजयपाल यांनी म्हटलं. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.

या मुंडन सोहळ्याला हजेरी लावणारे गावकरी रत्नेश मिश्रा म्हणाले, “मुंडन कार्यक्रमाचं निमंत्रण पाहून आम्हाला सुरुवातीला आश्चर्याचा धक्काच बसला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोकांनी हजेरी लावली होती. आम्ही या दाम्पत्यासाठी आणि त्यांच्या वासरासाठी खूपच आनंदी आहोत.”

ललतू वासराची आई म्हणजेच गाईला विजयपालच्या वडिलांनी विकत घेतलं होतं. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाने तिचा चांगला सांभाळ केला. मात्र, ललतू वासराला जन्म दिल्यानंतर तीचा मृत्यू झाला. त्यामुळे वासरुही एकटं पडलं होतं, त्यामुळेच विजपाल आणि त्यांच्या पत्नीने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. “जर आपण गाईला आई मानत असू तर तिच्या वासराला मुलगा का मानू नये” असं विजयपाल यांनी म्हटलं आहे.