प्रत्येक घरात वडिलांचं स्थान महत्वाचं मानलं जातं. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार नाही…याची काळजी घेत असतात. प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. करोना विषाणूच्या प्रादुर्भावादरम्यान मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांनी शहराचा बंदोबस्त अगदी चोखपणे सांभाळला. अनेक पोलिसांना करोनाचा सामना करताना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र आपला परिवार, घर-दार पाठीमागे सोडून कर्तव्याला पहिलं प्राधान्य देत मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी एखाद्या बापाप्रमाणेच या शहराची काळजी घेतली.

आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात असताना, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मुलांनी आपल्या बाबांसाठी एक खास व्हिडीओ बनवत त्यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. माझे बाबा सुपरहिरो आहेत…असं म्हणत मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मुलांनी आपल्या बाबांचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय. मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

लॉकडाउन काळात शहराची सुरक्षा करणं, अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना प्रसंगी लाठीचा प्रसाद देणं अशी अनेक जिकरीची काम मुंबई पोलीस गेल्या ३ महिन्यांच्या कालावधीत करत आहेत. प्रसंगी कठोर तर कधीकधी आपली प्रेमळ बाजू दाखवत शहराची काळजी घेणाऱ्या हा खाकी वर्दीतला बाप प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.