कोणत्या देशात कशाची स्पर्धा आयोजित करण्यात येईल सांगता येत नाही. कधी बर्गर खाण्याची, कधी केळी खाण्याची तर कधी आणखी काही. खाण्याच्या अशा अनेक स्पर्धांबाबत आपण ऐकतो पण मिरच्या खाण्याची स्पर्धा कधी तुम्ही ऐकलीय का? फार कमी लोकांनी या स्पर्धेबाबत ऐकलं असेल, पण चीनमधील हुनान प्रांतात नुकतीच लाल मिरच्या खाण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता मिरच्याच खाण्याची स्पर्धा का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हुनान हे शहर मसालेदार पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक पर्यटक येत असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या शहरातील निंगजियांग या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले जाते.

सौजन्य – एजन्सी फ्रान्स प्रेस

यामध्ये एका मिनिटात सर्वाधिक मिरच्या खाणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिक जाहीर करण्यात येते. चीनमधील ‘पीपल्स डेली चायना’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत सु नावाचा व्यक्ती पहिला आला. त्याने ६० सेकंदात एकापाठोपाठ एक अशा १५ मिरच्या खाल्ल्या. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची बसण्याची व्यवस्थाही अतिशय वेगळ्या पद्धतीची होती. पाण्याच्या टबात बसून याच पाण्यात ठेवण्यात आलेल्या लाल मिरच्या स्पर्धकांना खायच्या होत्या. तेव्हा या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांचे किती हाल होतात हे वेगळं सांगायला नको..पण तरीही अनेकांनी उत्फुर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला हे विशेष.