धबधबा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो डोंगराच्या कुशीत लांबवर असणारा वेगाने वाहणारा पाण्याचा प्रवाह. पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्याचे नयनमनोहारी रुप पाहण्यासाठी आपण खास सहलीचेही आयोजन करतो. पण हा धबधबा कृत्रिम असेल तर? आता बंगल्याच्या दारात किंवा हॉटेलच्या इंटेरियरमधूनही धबधबा असतो खरा. पण चीनमधील कृत्रिम धबधब्याची गोष्ट ऐकून तुम्हालाही धक्का बसल्यावाचून राहणार नाही. चीनमधील गुआंग शहरात ३५० फूटांचा कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला आहे. एका मॅनेजमेंट कंपनीकडून व्यवस्थापन केला जाणारा हा धबधबा एका इमारतीत तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही इमारत शहराच्या मध्यभागी आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तो बनविल्याचे सांगण्यात आले आहे.

आता इतका मोठा कृत्रिम धबधबा तयार करायचा म्हणजे त्यासाठी तितक्याच ताकदीची यंत्रणा लागणार. त्यामुळे या धबधब्यासाठी १२१ मीटर लांबीचा टँक तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये १८५ किलोवॅटचे ४ पंप लावण्यात आले आहेत. ज्याद्वारे वरच्या दिशेने पाणी खाली पोहचवले जाणार आहे. या इमारतीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या चार मजल्यांवर पाणी आणि ड्रेनेज सिस्टीम आहे. याठिकाणहून पाण्याचे शुद्धीकरण करुन ते पंपाद्वारे सोडले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया वीजेवर चालणारी असल्याने एका तासासाठी ८१०२ रुपये वीजेचा खर्च येतो. इंटरनेटवर अनेकांकडून या कृत्रिम धबधब्याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून अनेकांकडून हा वीजेचा आणि पाण्याचा अपव्यय असल्याची टिकाही करण्यात येत आहे.