उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उनला ‘लठ्ठ’ म्हणून संबोधण्यात चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. क्रूर हुकूमशहा अशी किमची प्रतिमा जगभरात आहे त्याच्या अन्यायाच्या काहाण्या सोशल मीडियावर हजारोंनी वाचायला मिळतील. सभेत डोळा लागला म्हणून तोफेच्या तोंडी देण्याएवढ्या क्रूर शिक्षा त्यांने दिलेल्या आहेत, त्यामुळे या हुकूमशहाच्या नावाची भिती एखाद्याला वाटली नाही तर नवलच म्हणावे लागेल. अशातच अनेकदा जागतिक नियमांचे उल्लंघन करत किम जाँग उनने अणुवस्त्र चाचण्या घडवून आणल्या आहे त्यामुळे अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान, चीन यांसारखे देश चांगलेच घाबरले आहेत. किमच्या या वागण्यामुळे अनेक राष्ट्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. किमला विरोध असणा-या देशांच्या यादीत चिनही अग्रभागी आहे.

चिनची जनता या हुकूमशहाला दूषणे देण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच चीनमध्ये किम जाँगला त्याच्या मुळ नावाने हाक मारण्याऐवजी ‘लठ्ठ किम’ या नावाने चिनी जनता संबोधते. एखाद्याच्या त्यातूनही विरोधकाला व्यंगावरून हिणवण्याची संधी अनेक जण सोडत नाही. त्यामुळे चिनी इंटरनेटच्या सर्च इंजिनमध्ये ‘लठ्ठ’ हा शब्द टाकला तरी किमचा फोटो येतो. ‘Kim Fatty III’ हा किवर्ड किमसाठी वापरला जातो. पण चिनीच्या ‘Weibo’ या सोशल मीडिया साईट आणि ‘Baidu’ या सर्च इंजिनवरुन हा शब्द कायमस्वरूपी ब्लॉक करण्याचा निर्णय चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. किम जाँग हा क्रूर हुकूमशहा असला तरी तो एका देशाचा नेता आहे आणि त्या देशाच्या नेत्याप्रती अवमानकारक शब्द वापरणे ही चीनी संस्कृती नाही असे सांगत हा किवर्ड कायमस्वरुपी सर्च इंजिनमधून हटवण्यात आला आहे. पण परराष्ट्र मंत्रायलयाच्या या निर्णयामुळे चिनी जनता मात्र फारशी खूश नाही. त्यामुळे त्यांनी  किमला पर्यायी शब्द शोधण्याचेही सुचवले आहे.