वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स ही सध्या काळाची गरज झाली आहे. दुचाकी असो अथवा चारचाकी लायसन्स हे गरजेचं आहे. वाहन परवाना मिळविण्यासाठी वाहनचालकाला परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास झाल्यानंतरच चालकाला लायसन्स मिळतं. सहाजिकचं लायसन्स मिळाल्यानंतर कोणाचाही आनंद द्विगुणित होईल. मात्र चीनमध्ये एका व्यक्तीने आनंदाच्या भरात जे काही केलंय ते पाहून हसू अनावर होईल.

चीनमधील एका व्यक्तीने लायसन्स मिळविल्यानंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये गाडी नदीमध्ये पाडल्याचं समोर आलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चीनमधील जुनी प्रांत येथील जहां जँग या व्यक्तीला बऱ्याच महिन्यांच्या मेहनतीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं होतं. लायसन्स मिळाल्याच्या आनंदात जँग घरी येत होता. मात्र आनंदाच्या भरात त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट नदीत जाऊन पडली.

जँग गाडी चालवत असताना त्याचं लक्ष मोबाइलकडे होतं.त्यामुळे त्याचा हा अपघात झाला. मात्र गाडी नदीच्या पुलावरुन खाली कोसळत असताना जँगने प्रसांगवधान राखत गाडीच्या खिडकीतून उडी मारली. यावेळी त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने जँगची गाडी बाहेर काढण्यात आली.