15 October 2019

News Flash

पंधरा वर्षांच्या मुलीच्या सल्ल्यावरून चीन उभारतोय १०० ‘सौर’पांडा

एका १५ वर्षांच्या मुलीने मांडलेल्या संकल्पनेवरुन चीन सरकारने उभारले अनोखे सौरऊर्जा प्रकल्प

पांडाची प्रतिकृती असणारे सौरऊर्जा प्रकल्प

जास्तीत जास्त तरुणांनी पारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करावा आणि या ऊर्जास्त्रोतांसंदर्भात जागृती व्हावी या उद्देशाने एदा ली यान तुंग या तरुणीने २०१५ साली वयाच्या १५ वर्षी एक संकल्पना माडली. पारंपारिक पद्धतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याऐवजी चीनमधील लोकप्रिय असणाऱ्या पांडा या प्राण्याच्या आकारामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची संकल्पना एदाने मांडली होती. एका लहान मुलीने मांडलेली ही संकल्पना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) आणि सौरऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या ‘पांडा ग्रीन एनर्जी ग्रुप’ या दोघांनी सत्यात उतरवण्यासाठी काम मागील दोन वर्षांपासून सुरु केले.

२०१७ साली दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन चीनमधील डॅटॉन येथे २४८ एकरामध्ये पहिला सौरऊर्जा प्रकल्प उभारला. या प्रकल्पामधील ‘सोलर पॅनल’ आकाशातून पाहिल्यानंतर दोन हसणाऱ्या पांडाच्या प्रतिकृती दिसतात. या प्रकल्पाला मागील दोन वर्षांमध्ये बरेच यश मिळाले आहे. त्यामुळेच आता युएनडीपी, ‘पांडा ग्रीन एनर्जी’ आणि चीन सरकार संयुक्तरित्या अशाप्रकारचे ९९ सौरऊर्जा प्रकल्प देशभरामध्ये उभारणार आहेत. या प्रकल्पांसाठी ३०० कोटी डॉलर्सच्या निधीची गरज असल्याची माहिती ‘पांडा ग्रीन एनर्जी’चे कार्यकारी अध्यक्ष ली यॉन यांनी ‘रॉयटर्स’शी बोलताना दिली.

हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या एदा ली यान तुंग या तरुणीने पांडाच्या आकारातील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडली. संयुक्त राष्ट्राने तरुणांसाठी २०१५ रोजी आयोजित केलेल्या हवामान बदलासंदर्भातील परिषदेमध्ये एदाने आपली संकल्पना पहिल्यांदा जगासमोर मांडली. एदा सध्या अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील पोर्टलॅण्ड येथे राहते.

उंचावरुन असे दिसणार चीनमधील १०० सौरऊर्जा प्रकल्प

२०१७ साली संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) आणि पांडा ग्रीन एनर्जी ग्रुप या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन चीनमधील डॅटॉन येथे पांडाची प्रतिकृती दिसणारा पहिला सौरऊर्जा प्रकल्प २४८ एकरामध्ये उभारला.

शंभर मेगावॅटच्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ३६ कोटींहून अधिक खर्च आला.

चीनमधील डॅटॉन येथील पांडाची प्रतिकृती असणाऱ्या या प्रकल्पामधून दहा हजार घरांना वीजपुरवठा होण्याइतकी वीजनिर्मीती होते.

अशाप्रकारचा दुसरा प्रकल्प २०१७ साली ऑक्टोबर महिन्यामध्ये गुईगँग येथे उभारण्यात आला. शंभर मेगावॅटच्या या प्रकल्पामधून ६ हजार घरांना वर्षभरासाठी पुरवता येईल इतकी वीजनिर्मिती होते.

चीनमध्ये अशाप्रकारचे १०० सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सरकारचा मानस आहे.

सौरऊर्जा वापरणाऱ्या जगभरातील देशापैकी चीन हा महत्वाचा देश असून पारंपारिक ऊर्जास्त्रोत वापरण्यासाठी २०१७ साली सरकारने निधीमध्ये वाढ करुन तो ३० टक्क्यांनी वाढवला. २०१७ साली चीनने सौरऊर्जानिर्मितीसाठी १२ हजार ६६० कोटी डॉलरहून अधिकची गुंतवणूक केली होती.

सौरऊर्जेपासून २०२० सालापर्यंत ११० गिगाव्हॅट्स वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ठ चीनने डोळ्यासमोर ठेवले आहे. ३ कोटी घरांना सौरऊर्जेपासून निर्माण करण्यात आलेली वीज पुरवण्याचा चीनचा मानस असून देशातील कार्बन निर्मितीचे प्रमाण कमी करण्यासाठी चीन हे प्रयत्न करत आहे.

२०१६ साली कोळसा जाळून झालेल्या वायूप्रदुषणामुळे चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिका आणि चीनमधील एका संशोधनानुसार कोळसा जाळल्याने होणाऱ्या प्रदुषणामुळे २०१३ साली जगभरामध्ये ३ लाख ६६ हजार जणांना प्राण गमावावे लागले. मृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी चीनने प्रत्येक मोठ्या शहरामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ साली तर आनुही प्रांतामधील एका बंद पडलेल्या कोळसा खाणीमध्येच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला.

सौरऊर्जा प्रकल्प उभारणारा पांडा ग्रीन एनर्जी ग्रुप हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या चीनमधील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे. पांडा ग्रीन एनर्जी ग्रुप सध्या फिजी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इटली या देशांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे रॉयटर्सने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे.

First Published on May 8, 2019 2:07 pm

Web Title: china plans to build solar farms shaped like giant pandas