आपल्या इथल्या लोकलची गर्दी काय असते हे सांगायला नको, एका डब्यात प्रवाशांची मर्यादा काय आणि त्यात प्रत्यक्षात किती प्रवासी असतात हे पाहिलं तर एखाद्याला चक्कर येईल. पण काय आहे आपल्याला याची सवय आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी आपला एक देश आहे म्हटल्यानंतर एवढ्या गर्दीची आपल्याला सवयच झाली आहे. आधीच भरलेल्या ट्रेन किंवा बसमधून प्रवास करताना आपण अशी काही गर्दी करून उभं राहतो की मुंगीलाही त्यातून वाट काढता येणार नाही. पण ट्रेन किंवा बसमध्ये हे चालून जातंय. पण तुम्ही कधी एका छोट्याच्या सहा सीटर व्हॅनमध्ये दाटीवाटीने कोंबून भरलेली माणसं पाहिलीत का?

अर्थात आपण भारतीयांनी हा प्रकार पाहिला असणार. गावाकडच्या भागात एका सहा सीटर व्हॅनमध्ये मर्यादापेक्षा जरा जास्तच माणसं भरतात. जिथे सहा जण बसू शकतात तिथे हमखास आणखी दोन तीन माणसं कोंबतात. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिलात ना तर तुम्हाला आपल्या इकडेच चालक तरी बरे असे बोलायची वेळ येईल. कारण चीनच्या एका चालकाने आपल्या सहा सीटर व्हॅनमध्ये दहा एक जण नाहीत तर चक्क ४० प्रवासी कोंबले. तुम्हाला वाचून धक्का बसला ना? रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाला तर यापेक्षाही जास्त धक्का बसला. वाहतुकीचे नियम मोडले म्हणून वाहतूक पोलिसाने व्हॅन बाजूला घ्यायला सांगितली. जेव्हा पोलिसाने वाहनात डोकावून पाहिले तेव्हा कोंबून भरलेले खाण कामगार त्याला दिसले. आता हे फार फार तर दहा पंधरा असतील असेच त्याला वाटले असेल पण दरवाज्या खोलून हे सगळे बाहेर येऊ लागले तेव्हा त्याला घेरी यायचीच बाकी होती. कारण एवढ्याशा गाडीत बिचारे ४० कामगार कोंबून कोबूंन भरले होते. हे सारे खाण कामगार असून त्यांच्या प्रवासावर फार खर्च करावा लागू नये यासाठी त्यांना एकाच गाडीतून कोंबून नेण्यात येत होते.

पैसे वाचवण्यासाठी या कामगारांच्या जीवाशी खेळ मांडला होता, आता ज्या देशाची लोकसंख्या एवढी आहे तिथे माणसाच्या जिवाला किड्या मुंग्याएवढं महत्त्व दिलं जातं यात आश्चर्य वाटायला नको. शेवटी या सगळ्या कामगारांना दुसऱ्या वाहनाने पाठवण्यात आलं असून, चालकावर त्यांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.