उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास करणे गरजेचे असते. त्यामुळे या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी शाळेतच केली जाते. शालेय जीवनात अभ्यासाला कायमच विशेष महत्व देण्यात येत असते. शाळेतील परिक्षा, रोजचा गृहपाठ अशा ना ना त-हेच्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. काही विद्यार्थी असे असतात जे अभ्यास पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना पहायला मिळतात. मात्र एक नवी पद्धत पहिल्यांदाच कोणी तरी अंमलात आणली आहे. या नव्या आणि विचित्र अभ्यास पद्धतीचा शोध अर्थात चीनमध्ये लागला आहे. या नव्या अभ्यास पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वच पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चीनमध्ये एक चिमुरडी चालत्या टॅक्सीमध्ये शाळेचा गृहपाठ करताना दिसून येत आहे. मात्र हा गृहपाठ करण्याची पद्धत सर्व सामान्य मुलांपेक्षा थोडी हटके आणि जीवघेणी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही चिमुरडी चालत्या टॅक्सीच्या खिडकीत बसून गृहपाठ करत आहे. तिची ही कृती पाहून एखाद्याला वाटेल ती एकटीच असल्यामुळे असा जीवघेणा खेळ खेळत आहे. मात्र, यावेळी ती एकटी नसून तिच्या बरोबर तिचे वडीलदेखील होते. ‘सीजीटीएन’ या न्युजचॅनेलने या प्रकाराचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात आली आहे.

या टॅक्सीमध्ये चिमुरडी तिचे वडील आणि वडीलांचा एक मित्र देखील होता. यावेळी वडील आणि त्यांच्या मित्रांच्या गप्पांमध्ये या चिमुरडीचा अभ्यास होत नसल्यामुळे तिने खिडकीतून बाहेर डोकं काढून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चिमुरडीने डोकं बाहेर काढलं तरी तिच्या वडीलांचे किंवा मित्राचे मुलीच्या या कृत्याकडे लक्ष नव्हते. मात्र या दुर्लक्षामुळे हा गृहपाठ मुलीच्या जीवावर चांगलाच बेतला असता.

दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी सर्वांची माफी मागितली असून पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही असे कबूल केले आहे. मात्र, तरीदेखील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या वडीलांचा चालक परवाना रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.