नूडल्स हा पदार्थ भारतात कधी आला आणि इतका प्रसिद्ध कधी झाला कोणालाच कळाले नाही. हे नूडल्स खाताना अनेकांची तारांबळ उडते. पण ते खाण्याची एक पद्धत असते. आता ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण एका चायनिज कंपनीने जागतिक रेकॉर्ड मोडण्यासाठी तब्बल ३,०८४ मीटरची नूडल तयार केली आहे. आता या इतक्या मोठ्या नूडलसाठी किती सामान लागले असेल विचारायलाच नको. तर या भल्या मोठ्या नूडलसाठी ४० किलो ब्रेडचे पीठ, जवळपास २७ लिटर पाणी आणि अर्धा किलो मीठ लागले.

याहून विशेष बाब म्हणजे इतकी मोठी नूडल तयार करायला किती वेळ लागला असेल असे तुम्हाला वाटते? तर १७ तास काम केल्यावर ही नूडल तयार करण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ही नूडल मोजायला परिक्षकांना तब्बल तीन तास लागले. याआधी सर्वात लांब नूडल तयार करण्याचे रेकॉर्ड जपानने केले होते. त्याची लांबी ५४८.७ मीटर इतकी होती. आता हा विक्रम चीनने मोडले आहे. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही नूडल अखंड असल्याची खात्री गिनिज बुककडून करण्यात येते. ती कुठेही जोडलेली असल्याचे लक्षात आल्यास तुम्ही स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता असते. आता या इतक्या मोठ्या नूडलचे पुढे नक्की काय झाले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ही नूडल लसूण, अंडी आणि टोमॅटो सॉसमध्ये तयार केली आणि कंपनीचे ४०० कर्मचारी आणि इतर पाहुण्यांना खायला देण्यात आली.