लग्नाचा दिवस म्हणजे घाई गडबडीचा आणि गोंधळाचा. लग्नाच्या दिवशी गोंधळ झाला नाही असं क्वचितच घडतं मग हे लग्न जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात असू द्या. मात्र चीनमधील एका लग्नामध्ये एवढा गोंधळ उडाला की ज्याचे लग्न आहे तो नवरदेवच स्वत:च्या लग्नाचा मुहूर्त उलटून गेल्यावर एका तासाने लग्नसमारंभाच्या ठिकाणी पोहचला.

झाले असे की चीनमधील हेलॉन्जियांग प्रांतातील हार्बिन येथील लॅव्हॉण्ड हॉटेलमध्ये हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. चीनमधील प्रथेनुसार नववधूला लग्न मंडपात घेऊन येण्यासाठी नवरा मुलगा झांग हा लिफ्टने अकराव्या मजल्यावर लिफ्टने जाण्यास निघाला. त्यावेळी अचानक लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने झांग आणि त्याचे नातेवाईक अडकून पडले. झांग आणि त्याच्यासोबत अडकलेल्यांनी आपत्कालीन मदतीसाठी असणाऱ्या सर्व उपाय करुन पाहिले मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. इकडे नवरी आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा हॉटेल प्रशासनाच्या मदतीने सर्व प्रयत्न केले मात्र लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर जवळजवळ ५० मिनिटांनी या सर्वांची सुटका झाली.

या बद्दल बोलताना झांग सांगतो, ‘ही लिफ्ट ओव्हरलोड झाल्याची कोणतीही माहिती आम्ही सर्वजण लिफ्टमध्ये चढल्यानंतर दिली गेली नाही. त्यामुळे लिफ्ट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यादरम्यान अडकली. यामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त हुकला आणि मी स्वत:च्याच लग्नाला एक तास उशीरा पोहोचलो.’ हे प्रकरण समोर आल्यानंतर चीनमधील लोकप्रिय समाजमाध्यम असणाऱ्या विबोवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अशाप्रकारे काही दिवसापूर्वी व्हॅटीकन सिटीमध्ये पोप लिफ्टमध्ये अडकले होते. त्यामुळे पोप यांची एक झलक पाहण्यासाठी सेंट पिटर्स स्वेअरवर जमलेल्या पर्यटकांना वाट पहावी लागली होती. १५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्यानंतर पोप सुखरुपपणे चर्चच्या बाल्कनीमध्ये पोहचले होते.