दोरीच्या उड्या हा एक उत्तम व्यायामप्रकार म्हणून ओळखला जातो. यामुळे उंची वाढणे, शरीर बळकट होणे असे अनेक फायदे होतात. लहानपणी दोरीच्या उड्या मारण्याचे वेगवेगळे प्रयोगही केले जातात. मग कोणाला चांगल्या उड्या मारता येतात याबाबत स्पर्धा लागते. जलदगतीने दोरीच्या उड्या मारण्याची अतिशय रंजक अशा स्पर्धेचेदेखील आयोजन केले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या स्पर्धेचे स्वरूप काहीसे असे आहे, दोन दोरीच्या उड्यांची एक एक टोकं समोरासमोर उभ्या असलेल्या दोन मुलांनी हातात पकडलेली आहेत. ते अतिशय वेगाने दोऱ्या फिरवत आहेत आणि तिसरा मुलगा मधोमध उभा राहून या दोऱ्यांवरून जलदगतीने उड्या मारत आहे. या मुलाने अतिशय शिताफीने पटापट मारलेल्या दोरीच्या उड्या पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. पापणी लवण्याच्या आत तो आपले डोके आणि पाय यांच्यामधून जाणाऱ्या दोऱ्यांवरून उडी मारतो.

शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा इतकी रंगली की कोणता संघ जिंकतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. चुरशीने चाललेल्या या स्पर्धेत अखेर चीनचा संघ विजयी ठरला. स्पर्धेच्या एका फेरीत जपान आणि चीन चे संघ आमनेसामने होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात स्पर्धा रंगली. चिनच्या स्पर्धकाने एका मिनिटात २५८ उड्या मारल्या तर जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकाने एका मिनिटात २२६ उड्या मारल्या. परदेशातील अनेक क्रिडा चॅनलवर या स्पर्धेचे प्रक्षेपण दाखविण्यात आले.