भारतीय शास्त्रीय संगीताला जगात विशेष स्थान आहे. सध्या या संगीतावर जगभरात अभ्यास केला जात असताना त्यातील बारकावे समजून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. शास्त्रीय संगीतात प्राविण्य मिळवणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे भल्याभल्या भारतीय गायकांना ते शिकण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण एखाद्या परदेशी व्यक्तीने शास्त्रीय गीत गाण्याचा प्रयत्न केला तर? आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडियो व्हायरल होत असून यामध्ये चीनचा एक व्यक्ती अतिशय नेमकेपणाने शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावरील नेटीझन्सनीही या गायकाला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून त्याच्या सूरांनी आपण मंत्रमुग्ध झाल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा चीनचा गायक कोणतंही जुनं भारतीय गाणं गात नसून तो कर्नाटकी संगीताचा राग शंकरभारनम गातोय. सर्वांना आपल्या व्हिडियोने आकर्षित करणाऱ्या या अवलियाचं नाव आहे, चाँग चोऊ सेन आहे. मलेशियात जन्मलेला चाँग चीनचा रहिवासी आहे. त्याला साई मदन मोहन कुमार नावानेही ओळखतात. कर्नाटकी संगीतकार डी के पट्टम्मल यांच्याकडे ते अनेक वर्षापासून संगीताचं शिक्षण घेत आहेत. संस्कृतमध्ये भजन शिकण्यापासून सेन यांनी सुरूवात केली होती आणि आता ते शास्त्रीय संगीतातील अनेक गाणी उत्तमरितीने गाऊ शकतात.