तासन् तास तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलात तर काय कराल? ही कोंडी सुटत नाही तोपर्यंत उगाचच हॉर्न वाजवत बसाल? सरकारपासून, रस्त्यात चालणा-या माणसांपर्यंत ते थेट कोंडी सोडवू न शकणा-या वाहतूक पोलिसाला देखील दुषणे द्याल? उशीर झालेल्या आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रत्येक माणसाला राग अनवार झाला की असेच काही करावेसे वाटते. मग या ना त्या कारणामुळे हा राग बाहेर पडतो. पण वाहतूक कोंडीत सापडलेल्या चिनी लोकांनी मात्र याही परिस्थितीत संयम बाळगत त्याचा आनंद लुटला आहे. कित्येक तास उलटून गेल्यानंतर वाहतूक कोंडी न सुटल्याने काही चिनी महिलांनी एकत्र येऊन चक्क रस्त्यात नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाहतूक कोंडी ही चिनची मोठी समस्या बनत चालली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण आहे. वायू प्रदूषामुळे शहरात इतका धूर पसरतो की अनेकदा समोरचे अधुंक दिसू लागते. या धूरामुळे चीनमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गाड्यांच्या लांबलचक रांगा रस्त्यावर दूरदूरपर्यंत होत्या. ही कोंडी सुटण्याची वाट पाहण्याएवढा एकमेव पर्याय नागरिकांकडे होता पण अशाही परिस्थितीत संतप्त न होता चिनी महिलांनी कमालीचा संयम दाखवला. यातल्या काही महिलांनी रस्त्यावर उतरून नृत्य केले. अनेकांनी या महिलांना साथही दिली. एका प्रसिद्ध गाण्यावर महिलांनी ठेका धरला. याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सोमवारी चीनच्या weibo या सोशल मीडियावर या व्हिडिओला खूपच प्रसिद्धी मिळाली. काही काळ का होईना लोकांनी वाहतूक कोंडीची समस्या विसरून मनमुराद या नृत्य कार्यक्रमाचा आनंद लुटला.