आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनी ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे बालगीत लहानपणी अगदी चालीत म्हटलं असेल. या गाण्यामध्ये चॉकलेटचं विश्व कसं असेल याबद्दलचे स्वप्नरंजन केल्याचं आजही आपल्याला छान आठवत असेल. चॉकलेटचा बंगलाच काय तर चॉकलेटचा पाऊस पडला तरी किती मज्जा येईल असा विचार करणारेही अनेक आहेत. मात्र स्वित्झर्लंड नुकताच चॉकलेटचा पाऊस पडलाय असं सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणार नाही पण खरोखर असं घडलं आहे ते एका विचित्र कारणामुळे.

हा चॉकलेटचा पाऊस पडला आहे स्वित्झर्लंडमधील झुरिक आणि बासेल या दोन मोठ्या शहरांच्या मध्यावर असणाऱ्या ओल्टेन शहरामध्ये. या शहरामध्ये लिंथ अ‍ॅण्ड स्प्रुएन्गली ही चॉकलेटची जगप्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीच्या व्हेटीलेटर सिस्टीममध्ये मंगळवारी (१८ ऑगस्ट रोजी) तांत्रिक अडचण निर्माण झाली. कोको निब्स (लहान लहान तुकडे) भाजल्यानंतर ते थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे कुलींग व्हेटींलेटर्स खराब झाले. त्यामुळे ज्या कोकोपासून चॉकलेट बनवलं जातं ती कोको पावडर, निब्सच या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून कारखान्याबाहेर फेकली गेली. लिंथ चॉकलेट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे हे मुख्य घटकच कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले. त्यातच या परिसरामध्ये जोरदार वारा असल्याने ही पावडर लांबपर्यंत पसरली. त्यामुळे स्थानिकांना अनेक घरांच्या खिडक्यांवर तसेच गाड्यांवर कोको पावडरचे छोटे छोटे कण दिसून आले. काही ठिकाणी हे कण बर्फामध्ये एकत्र होऊन पडल्याचेही पहायला मिळालं. त्यामुळे हा चॉकलेटमधील कोको असलेला बर्फाचा पाऊस स्थानिकांना अनुभवायला मिळाला.

एका पांढऱ्या गाडीच्या बोनेटवरील कोको पावडरचा फोटो ट्विटवरही पोस्ट करण्यात आला आहे. या गाडीच्या मालकाला कंपनीने गाडी पूर्णपणे स्वच्छ धुवून देण्याची ऑफर देण्यात आल्याचे कंपनीने म्हटलं आहे. मात्र या मलकाने कंपनीची ही ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही.

फोटो सौजन्य : ट्विटर

व्हेंटीलेटरमधील हा बिघाड कंपनीतील एका सेक्शनपुरता मर्यादीत असल्याने चॉकलेटच्या निर्मितीवर काहीही परिणाम झाला नाही असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसेच वातावरणामध्ये पसरलेली ही कोको पावडर हानीकारक नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीने तातडीने व्हेंटीलेटर दुरुस्त करुन घेतल्याचेही सांगितले आहे.