नाताळ म्हटलं की आपल्याला आठवतो तो सांताक्लॉज आणि ‘ख्रिसमस ट्री’. साधारणपणे बर्फाळ प्रदेशात असणारा हा ‘ट्री’ या काळात सजवला जातो. नाताळ आला की दारात असणाऱ्या ख्रिसमस ट्रीला रंगीबेरंगी वस्तूंनी सजवून तो सुशोभित केला जातो. घरी किंवा अगदी ऑफीसेसमध्येही ख्रिसमसच्या काळात हे ट्री आपल्याला दिसतात. त्यामुळे नाताळच्या दिवसात ‘ख्रिसमस ट्री’ला मोठी मागणी असते. कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ हल्ली सर्वत्र उपलब्ध असतात. ते स्वस्त आणि एका
ठिकाणहून दुसरीकडे न्यायलाही सोपे असतात. असे असले तरीही अनेक देशांत बऱ्याच ठिकाणी खऱ्या ‘ख्रिसमस ट्री’ला मोठी मागणी असते.

ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका अशा अनेक ठिकाणी खास ‘ख्रिसमस ट्री’ची शेती केली जाते. स्कॉटलंडमधले एडनमी फार्म हे त्यातलंच एक. येथे स्कॉट पाईन, फर, नॉर्डमन फर, स्प्रूस अशा अनेक प्रकारच्या झाडांची शेती केली जाते. नाताळच्या काळापर्यंत ही झाडे वाढवतात आणि त्यांची अतिशय नेमक्या पद्धतीने कापणी करतात. ही झाडे वर्षाला ३० सेंटीमीटर इतकी वाढतात. झाडे ठराविक उंचीची झाली की मग त्यांची विक्रीसाठी कापणी करण्यात येते. ही झाडे वाढायला सामान्यपणे दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागतो. झाडांचा आकार जितका मोठा तितकी त्याची किंमत जास्त असं एकंदर गणित असतं. ही शेती करणाऱ्यांचे नाताळच्या काळात चांगले उत्पादन होते.

दरवर्षी १ डिसेंबरला ‘ख्रिसमस ट्री’ची कापणी करायला सुरुवात होते. त्यानंतर वेगवेगळ्या देशांत मागणीनुसार त्याची निर्यात केली जाते. युरोपात दरवर्षी ८० लाखांहून अधिक खऱ्या ‘ख्रिसमस ट्री’ची विक्री होते असे एका अहवालातून समोर आले आहे. दरवर्षी ही मागणी कमी अधिक प्रमाणात बदलते.