देशभरात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होण्याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील उद्योगपतींसोबत बैठक घेतली. या बैठकीचं देशातील प्रमुख उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी विशेष कौतुक केलं आहे.

मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत करोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये यासाठी केलेल्या उपाययोजना आणि वेगवान लसीकरण याबाबत उद्योगपतींशी चर्चा केली. सीएमओ महाराष्ट्राच्या ट्विटर अकाउंटद्वारे या बैठकबाबत माहिती देण्यात आली. सीएमओने केलेल्या ट्विटवर लगेचच आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलं आणि बैठकीचं कौतुक केलं. “ज्या पद्धतीने बैठक झाली त्यावरुन आमची ही बैठक उपयुक्त झाली असं वाटतं… कारण, अ ) औपचारिक किंवा शिष्टाचारी वक्तव्यांमध्ये वेळ वाया घालवण्यात आला नाही… ब) बैठकीत अजेंडा केंद्रीत होता… क) वास्तव लक्षात घेऊन सरकार व कॉर्पोरेटद्वारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर जोर देण्यात आला… ड) याशिवाय पूर्ण मोहिमेच्या पाठपुरावा व समन्वयासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला…” असं ट्विट करत महिंद्रा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वेळ वाया न घालवता मुख्य आणि नेमक्या मुद्द्यांवर सल्लामसलत करण्यात आल्याचं म्हटलं व या बैठकीचं कौतुक केलं.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी उद्योजकांना मदतीचं आवाहन केलं होतं. 14 एप्रिल रोजी राज्यात कडक निर्बंध लागू करतेवेळी ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था अजून सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांसोबतच उद्योजकांनीही मदत करावी असं आवाहन केलं होतं. तर, यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी राज्यात लॉकडाउन लागू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यावेळी त्यांनी लॉकडाउनपेक्षा राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता महिंद्रांनी मुख्यमंत्री ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीचं कौतुक केलं आहे.