‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ हे एक प्रचंड ग्लॅमर असलेलं नाव आहे. जगातले सगळे रेकॉर्ड्स गिनिज बुकमध्ये नोंदवले गेले आहेत. तुम्ही कितीही फास्ट असा, बलशाली असा की उंच असा. तुमचं नाव जोपर्यंत गिनिज बुकात नोंदलं जात नाही तोपर्यंत तुमच्या पराक्रमाला जगात मान्यता मिळत नाही. एखादा रेकॉर्ड करायचा ठरवला तरी त्यासाठी अनेक वर्षांपासून तयारी करावी लागते.

गिनिज बुकविषयी सांगण्याचं कारण हे की कोईम्बतूरमधल्या एका शाळेच्या १६७ मुलांनी वर्ल्ड रेकॉर्ड रचत गिनिज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं. ही मुलं ६वी ते ११वी या इयत्तांमधली होती. या १६७ मुलांनी एकत्र येत डॉ ए.पी.जे. अब्दुल कलामांचं पोर्टेट बनवलं. पण हे पोर्ट्रेट साधंसुधं नव्हतं तर ते पेपर कप्सचा वापर करून तयार केलंय. त्यांच्या शाळेतल्या ९८१ चौरस मीटर जागेमध्ये तब्बल २ लाख पेपर कप्सचा वापर करत अब्दुल कलामांचं हे पोर्ट्रेट त्यांनी बनवलं आहे. कोईम्बतूरच्या कॅमफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विक्रम रचत असताना या मुलांनी हे पोर्ट्रेट फक्त चार तासांमध्ये तयार केलं. त्यासाठी या मुलांनी उत्तम नियोजन केलं. आपापसात योग्य समन्वय राखला. आणि हे २ लाख पेपर कप्स पद्धतशीरपणे रचत त्यांनी हे चित्र तयार केलं. यावेळी तिथे ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधीही हजर होते. मुलांच्या या कामगिरीचा व्हिडिओ पुरावा म्हणून गिनिज बुकला पाठवण्यात येणार आहे.

पेपर कप्सच्या साह्याने एवढं मोठं चित्र तयार करण्याचा याआधीचा रेकॉर्ड लखनौमध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केला गेला होता. त्यावेळी सुमारे दीड लाख पेपर कप्स वापरून ६२७ चौरस मीटरचा व्होडाफोनचा लोगो तयार करण्यात आला होता.