एकमेकांवर प्रेम असतंच हो.. पण संसार सुखाचा व्हायचा असेल तर राहायला चांगलं घर हवं, घरात अावश्यक वस्तू हव्यात अशा कित्येकांच्या अपेक्षा असतात. पण खंर प्रेम कुठेही फुलत जातं. मग त्यासाठी टुमदार बंगला नको की फ्लॅट नको. चंद्रमोळी झोपडीतही सुखाचा संसार होतो. तुम्हाला खरं वाटत नाही ना? तर मग मारिया आणि म्यूगलच्या घरात एकदा डोकावून पाहाच.

वाचा : पुरूषांसाठी लढणारी बाई

मारिया आणि म्यूगल. कोलंबियातल्या सगळ्यात कुप्रसिद्ध ठिकाणी एकमेकांना भेटले होते. दोघंही ड्रग्जच्या आहारी गेलेले. दोघांपुढे भविष्य असं काही नव्हतंच. पण एक दिवस आपण या दुनियेतून बाहेर पडायला हवं याची जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. या वाईट दुनियेतून त्यांना बाहेर पडायचं होत. वाईट काम केलं की जग बोलतं, पण वाईट काम करणाऱ्याला यातून बाहेर काढण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही याचा अनुभव दोघांनाही आला. मारिया आणि म्यूगल दोघांचेही नातेवाईक त्यांना स्वीकारायला तयार नव्हते. काय करायचे? कुठे जायचे? दोघांनाही कळत नव्हतं. पण  ड्रग्जच्या दुनियेत कधीच फिरकायचे नाही हे मात्र त्यांना पक्क ठावूक होतं. जग आपल्याला स्विकारत नाही म्हणून काय झालं? जगाशिवाय कोणाचं काही अडतं का? एकेकाळी जगानं त्यांच्याकडे तोंड फिरवलं. पुढे याच जोडप्यानं जगाकडे पाठ फिरवली आणि एका पाइपलाइनमध्ये आपला संसार थाटला.

वाचा : आजोबांसाठी कायपण!

कोणी राहायला घरं देईना. घर घेण्याइतके पैसेही नव्हते. मग काय ज्या पाइपमधून सांडपाणी वाहून नेले जायचे तिथेच या दोघांनी आपला संसार फुलवला. गेल्या बाव्वीस वर्षांपासून ते दोघेही याच पाईपमध्ये राहत आहे. घरात मोजक्या वस्तू, एक छोटासा टीव्ही आणि साथीला एक कुत्रा.. एवढंच यांचं कुटुंब. ड्रग्जच्या जाळ्यातून दोघांनी स्वत:ला बाहेर काढलं. जगण्याची आशा आणि एकमेकांत प्रेम असलं की संसार सुखाचा होतोच मग त्याच्यासाठी बंगला, पैशांची आवश्यकता नसते हे दोन्ही जोडप्यांनी जगाला दाखून दिले.