पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात डिवचल्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली. त्यानंतर एअर इंडियानेही कुणाल कामरावर विमान प्रवासाची बंदी घातली.

सर्वप्रथम इंडिगोच्या बंदीवर प्रतिक्रिया देताना कुणालने केवळ सहा महिन्यांची बंदी घातल्याबद्दल इंडिगोचे आभार मानले होते. आभार मानताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ‘तुम्ही केवळ सहा महिन्यांचीच बंदी घातली पण मोदीजी एअर इंडियावर कायमस्वरुपी बंदी आणत आहेत’, असं ट्विट त्याने केलं. त्यानंतर थोड्याचवेळात एअर इंडियानेही कुणाल कामरावर पुढील सूचना मिळेपर्यंत विमान प्रवासाची बंदी घातली. “इंडिगोच्या विमानातील कुणाल कामराची वर्तणूक अस्वीकारार्ह आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत त्याच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात येत आहे,”असं एअर इंडियाने ट्विटरद्वारे स्पष्ट केलं. एअर इंडियाने घातलेली बंदी कुणाल कामरासाठी अनपेक्षित होती. त्यामुळे त्याने ट्विटरद्वारे एअरइंडियाच्या ट्विटला उत्तर देताना ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ अशा आशयाचं ट्विट केलं. “एकदा एअर इंडियाने जाताना माझ्याकडील ‘लगेज’चं वजन चार किलोग्रॅम अधिक भरलं, तुमची मशिन बंद होती आणि माझ्याकडे रोख पैसे नव्हते. कर्मचारी जाऊद्या म्हणाला. पण तुमची कंपनी तोट्यात आहे, मी पैसे देऊनच जाईन असं मी त्यांना म्हणालो. माझ्याकडून पैसे कसे घ्यायचे याची पर्यायी व्यवस्था करेपर्यंत मी थांबलो होतो….पण अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का” असं ट्विट कुणालने केलंय.

आणखी वाचा – अर्णब गोस्वामींशी गैरवर्तन भोवलं; कुणाल कामराला एअर इंडिया, इंडिगोतून हवाई प्रवासास बंदी

मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 5317 या विमानाने कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी प्रवास करत होते. कुणाल कामराने या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं. व्हिडिओत कुणाल कामरा हा गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका करताना “गोस्वामी भित्रट आहे असं म्हणताना दिसतोय. त्यासोबत कुणालने निवेदनही जारी केलं आहे. त्यामध्ये मला काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही असं त्याने स्पष्ट केलंय. आपल्या निवेदनात त्याने, “मी आज लखनौला जाणाऱ्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना बोलण्याची मी विनंती केली पण त्यांनी फोनवर बोलत असल्याचं भासवलं आणि मी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी सीटबेल्टचा संकेत बंद होता. नंतर सीटबेल्ट लावण्यास सांगण्यात आलं आणि एअरलाईन कर्मचाऱ्याने मला जागेवर जाण्यास सांगितलं. त्यानंतर टेक ऑफ झाल्यावर मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो आणि बोलण्याची विनंती केली. पण आपण काहीतरी पाहत असल्याचं सांगत त्यांनी मला टाळलं. मी वारंवार विनंती केली. नंतर मला त्यांच्या पत्रकारितेबद्दल काय वाटतं याबद्दल एक स्वगत सादर केलं. माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. ‘रिपब्लिक टीव्ही’चे लोक प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर जे करतात तेच मी केलं. आत्महत्या केलेल्या रोहित वेमुल्लासाठी आणि त्याच्या आईसाठी मी हे करतोय. त्याच्या जातीबाबत तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये चर्चा करत होतात. मी हे करतोय, मला त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही. असं कामराने एका निवेदनात म्हटलं. यानंतर केलेल्या ट्विटमध्ये हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं कुणालने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मी वैयक्तिकरित्या सर्व क्रू मेंबर्सची माफी मागितली. मला नाही वाटत मी कोणताही गुन्हा केला आहे. मी हे सर्व रोहित वेमुल्लासाठी केलं. मी एक व्यक्ती सोडून सर्वाची माफी मागितली,”असंही त्यानं नमूद केलं आहे.

कुणाल कामराने ट्विट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.