करोना महामारीच्या काळात कुठेही प्रवास करणं हे धोक्याचं मानलं जातं. जगभरात करोनाचा प्रसार झाल्याने अनेक देशांनी मार्च महिन्यापासून लॉकडाउन लागू केला होता. काही देशांनी आता हळूहळू निर्बंध उठवण्यास सुरूवात केली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेली ७-८ महिने सर्व लोक आपापल्या घरीच राहिले होते. पण लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होताच आता परराज्यात किंवा परदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा लोकांना पुढचं परदेशात फिरायला जाण्याचं ठिकाण कोणतं असावं याबद्दल निर्णय घेण्यास मदत करत आहेत.

महिंद्रा यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून महिंद्रा यांनी एक भन्नाट खेळ इतरांसोबत शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांच्यासारखे प्रसिद्ध व्यावसायिक अशाप्रकारचे मार्गदर्शन करत आहेत हे ऐकून लोकांना थोडंसं विचित्र वाटेल. पण या खेळात एक ट्विस्ट आहे. तुम्हीच पाहा त्यांचे ट्विट…

या खेळात आनंद महिंद्रा यांनी १ ते ९ या आकड्यापैकी एक आकडा मनात धरायला सांगितला आहे. त्यानंतर त्या आकड्याला ३ ने गुणा, त्यात ३ मिळवा आणि पुन्हा ३ ने गुणा अशी काही गणितं त्यांना करायला सांगितली आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण गणितीप्रकियेनंतर तुम्ही कोणताही आकडा मनात धरला असेल, तरी त्याचं उत्तर सारखंच येत असल्याचं दिसतंय. त्यामुळे या गणिताच्या खेळाच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी मजेशीर पद्धतीने भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांना एक उत्तम असा संदेश दिल्याचं दिसतंय.