विमानतळ म्हटलं की अनेकांचे कुतूहलाचे ठिकाण असते. काही लोक पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार असतात तर काही जण प्रवास करुन कंटाळलेले असतात. पण पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना विमानतळावरील औपचारिकता कशी पूर्ण करायची हा मोठा प्रश्न असतो. अनेकजण ही औपचारिकता पूर्ण करताना गोंधळूनही जातात. असाच एक रशियन प्रवाशी विमानतळावर सामानाची तपासणी करताना गोंधळून गेला असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाची ट्राउझर परिधान केलेला व्यक्ती पाहायला मिळतो आहे. विमान तळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान तो काहीसा गोंधळलेला दिसत आहे. मेटल डिटेक्टर पार केल्यानंतर नेमकं कुठे जायचे असा प्रश्न त्या व्यक्तीला पडतो. मग तो विचार करून सामानाची तपासणी करण्यासाठी बॅग स्कॅनरवर चढतो आणि सामानसह त्या स्कॅनरमधून बाहेर पडतो. त्या व्यक्तीला बॅग स्कॅनरमधून बाहेर पडताना पाहून सुरक्षा रक्षकही आश्चर्यचकित होतो आणि त्याला प्रश्न विचारण्यास सुरूवात करतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच अनेकांनी या व्यक्तीची खिल्लीही उडवली आहे.

याआधीही अशीच एक घटना चीन रेल्वेस्थानकावर घडली होती. आई, वडिल आणि चार सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून एक लहान मुलगी बॅग स्कॅनरमध्ये शिरली होती. ती चिमुकली बॅग स्कॅनरमधून बाहेर पडल्याचे पाहताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो.