पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या साडेतीन वर्षांच्या कारकीर्दीचे सर्वाधिक बोचऱ्या टीकेचे लक्ष्य ठरलेले वैशिष्ट्यं म्हणजे त्यांचे परदेश दौरे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मोदींनी पहिल्या ३ वर्षांत चक्क ४९ देशांना भेट दिली असल्याची माहिती समोर आली. या परदेश दौऱ्यांबरोबरच आणखी एक गोष्ट नेहमीच चर्चेचा आणि खिल्लीचा विषय ठरते ती म्हणजे मोदींची मिठी.

मोदींनी त्या त्या देशांच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांना स्वागताच्यावेळी मारलेली मिठी नेहमीच मीम्सचा विषय ठरतात. त्यातल्या अनेकांना तर मोदींनी मारलेली मिठी म्हणजे अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्काच असतो. त्यामुळे कधी कधी त्यांच्या मिठीमुळे अनेकजण पूर्णपणे संकोचून जातात. मिठी मारण्याच्या नेमक्या याच मोदींच्या कृतीवर काँग्रेसनं एक मीम्स व्हिडिओ तयार करून त्यांची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करून मोदींना चिमटा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. मोदींच्या या सवयीला त्यांनी ‘Hugplomacy’ असं नाव दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या टि्विटर अकाऊंटवरून आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ‘भाजपचा स्टार प्रचारक बननण्याची रेसिपी ही आहे. मात्र ती वापरण्याचा सल्ला आम्ही देत नाही’ अशा कॅप्शनसहीत हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. भाजपचा स्टार प्रचारक बननण्याच्या रेसिपीसाठी एक किलो गुन्हेगारी पार्श्वभूमी, एक लीटर भगव्या रंगात बुडवलेले कापड, अर्धा कप मगरीचे अश्रू अशा साहित्याची गरज असल्याचे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात आली होती.