पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून काँग्रेस केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळवारी संध्याकाळी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली. तसंच वाढत्या किंमती आणि उत्पादन शुल्कातील वाढ यावरही कार्यकारी समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

सध्या करोनाच्या संकटामुळे जनता आधीच त्रस्त आहे. त्यातच ही वाढ अन्यायकारक असून जनतेवर जबरदस्ती लादण्यात येत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं. काँग्रेसनं कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केलं होतं. तसंच यासंदर्भात एक ट्विटही करण्यात आलं होतं. परंतु यामध्ये काँग्रेसनं एक चूक केली आणि विरोधीपक्षांनी मात्र त्यावरून काँग्रेसची फिरकी घेण्यास सुरूवात केली. यामध्ये त्यांनी हिंदीमध्ये ‘कार्यसमिति’ लिहिण्याऐवजी ‘कायरसमित’ असा उल्लेख केला होता. मात्र हे पाहताच विरोधकांनीही त्यांची फिरकी घेण्यास सुरूवात केली. परंतु काही वेळानं आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी जुनं ट्विट डिलीट करून नवं ट्विट केलं.

उत्तर प्रदेशचे भाजपा नेते शलभमणी त्रिपाठी यांनी काँग्रेसच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. “याला आपण महत्त्व दिलं पाहिजे, जरी आपण सांगितलं नाही तरी काँग्रेसची ही वस्तुस्थिती देशाला आधीच ठाऊक होती,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. तर दुसरीकडे भाजपाचे दिल्लीतील नेते तेजिंदर सिंह बग्गा यांनी “मी काँग्रेसच्या या गोष्टीशी सहमत आहे,” असं म्हटलं.