हैदराबादमध्ये दोन वाहतूक पोलीस एका प्रवाशासाठी देवदूत ठरले आहेत. या पोलिसांवर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कॉन्स्टेबल के.चंदन आणि इनायुतल्ला यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता झटपट हालचाल केल्यामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. हैदराबादमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर चालत असताना अचानक एक प्रवाशाला धाप लागली. श्वासोश्वास करताना त्रास त्यांना त्रास होऊ लागला.

त्यावेळी तिथे डयुटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल के.चंदन आणि इनायुतल्ला यांनी समयसूचकता दाखवत उपचार सुरु केले. कदाचित ते रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबले असते तर उशीर झाला असता. ज्या प्रवाशाला त्यांनी जीवनदान दिले तो ह्दयविकाराचा रुग्ण आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने सुद्धा या दोन्ही पोलिसांचे कौतुक केले आहे.

माणूसकी आणि समयसूचकता दाखवत बहादूरपूरा येथील वाहतूक पोलीस के.चंदन आणि इनायुतल्ला यांनी ह्दयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला सीपीआर देऊन प्राण वाचवले. दुसऱ्याची सेवा करणे हा मानवाचा मोठा गुण आहे. सलाम असे टि्वट लक्ष्मणने केले आहे.

कार्डिअॅक अरेस्टचा झटका आलेल्या रुग्णाच्या ह्दयात रक्तप्रवाह खेळता रहावा तसेच ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी छातीवर दाब दिला जातो आणि कृत्रिम श्वसोश्वासावर ठेवले जाते. त्याला सीपीआर म्हणतात. कॉन्स्टेबल के.चंदन आणि इनायुतल्ला यांनी त्यावेळी नेमके हेच उपचार केले. ज्यामुळे एका माणसाचे प्राण वाचले.