आपल्यापैकी अनेकजण दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोशल नेटवर्किंगवर शेअर करत असतात. यामध्ये अगदी रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी जागतिक स्तरावरील घडामोडींवर करोडो लोकं रोज व्यक्त होत असतात. ट्विटर इंडियाने याच व्यक्त होण्यासंदर्भात एक अभ्यास केला असून यामध्ये वेगवेगळ्या शहरांमधील लोकांना कोणत्या गोष्टींबद्दल भाष्य करायला आवडतं याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नॉस्टेलिजिया म्हणजेच आठवणींमध्ये रमण्याच्या बाबतीत मुंबईकर देशात आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर प्राण्यांसंदर्भातील विषयांवर बोलण्यात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कसा करण्यात आला अभ्यास?

ट्विटर इंडियाने क्विल्ट डॉट आय या वेबसाईटच्या मदतीने सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीमधील आठ लाख ५० हजार ट्विटसचा अभ्यास केला. यामधून त्यांनी ‘कॉनव्हर्सेशन रिप्ले’ नावाचा अहवाल सादर केला आहे. या अभ्यासामध्ये देशातील २२ शहरांमधील लोकांना केलेल्या ट्विटसचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये प्राणी, उत्सवासंदर्भातील चर्चा, सेलिब्रिटींनी पोस्ट केलेले ट्विट, चांगल्या कामासंदर्भातील ट्विट, कुटुंब, खाणं, ह्युमर, आठवणी, रोमान्स आणि खेळ अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सर्व ट्विटसला विभागण्यात आलं. यामधून कोणत्या शहरांमध्ये सर्वाधित ट्विट करण्यात आले, रिप्लाय करण्यात आले असा सर्व डेटा गोळा करुन एक सर्वसमावेशक यादी तयार करण्यात आली.

कोणत्या यादीत कोणते शहर आघाडीवर?

> प्राण्यांबद्दल बोलण्यात रायपूर पहिल्या क्रमांकवर आहे. एर्नाकुलम दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

> सेलिब्रेशन म्हणजे आनंद व्यक्त करण्यामध्ये हैदराबाद शहर अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल इंदूरचा क्रमांक लागतो. तर सेलिब्रेशन करण्यात तिसऱ्या क्रमांकावर विशाखापट्टणम शहर आहे.

> भुवनेश्वर हे शहर कुटुंब या विषयावर ट्विट करण्यात अग्रस्थानी आहे. त्याखालोखाल कानपूर आणि चेन्नईचा क्रमांक लागतो.

> एखादा खास क्षण साजरा करण्याच्या बाबतीत चेन्नई पहिल्या क्रमांकावर असून विशाखापट्टण दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर कोईम्बतूर शहर आहे.

> चांगल्या गोष्टी म्हणजेच कृत्यांबद्दल बोलण्यामध्ये भुवनेश्वर अव्वल स्थानी, लुधियाना दुसऱ्या तर मोहाली तिसऱ्या स्थानी आहे.

> खाद्य पदार्थांबद्दल सर्वाधिक चर्चा करणाऱ्या शहराचा मान एर्नाकुलमला मिळाला असून बेंगळुरु दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी लुधियाना आहे.

> ह्युमर या विषयामध्ये चेन्नई पहिल्या, मोहाली दुसऱ्या तर कोईम्बतूर तिसऱ्या स्थानी आहे.

> आठवणींमध्ये रमण्यात म्हणजेच जुन्या गोष्टींबद्दल बोलण्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर, विशाखापट्टणम दुसऱ्या आणि कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

> सर्वाधिक रोमॅन्टीक शहर म्हणून लुधियानाचे नाव पहिल्या क्रमांकावर झळकले आहे. म्हणजेच प्रेम या विषयावर सर्वाधिक बोलणारी लोकं लुधियानामधील आहेत. त्या खालोखाल अहमदाबाद आणि कोलकात्याचा क्रमांक लागतो.

> खेळांबद्दल सर्वाधिक चर्चा करणाऱ्या शहरांमध्ये एर्नाकुलम पहिल्या स्थानी, भुवनेश्वर दुसऱ्या आणि चेन्नई तिसऱ्या स्थानी आहे.


या यादीमधून भारतीय अनेक विषयांवर चर्चा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे असं म्हणता येईल.