देशभरामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव जाणवू लागला आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमधील करोना सेंटर्ससोबत रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना वेगळवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. असाच एका रुग्णाचा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये एक करोना रुग्ण ‘करोनाची भीती नाही वाटत, पंख्याची वाटतेय,’ असं सांगत रुग्णालयातील पंख्याची तक्रार करत पंखा करताना दिसत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्याच्या रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. सोशल मिडीवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची दखल घेण्यात आली आणि तो पंखा दुरुस्त करण्यात आला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक रुग्ण व्हिडीओ सुरु झाल्यानंतर तो, ”कोरोना से नही सहाब पंखे से डर लगता है” म्हणत वर फिरणारा पंखा दाखवतो. सिलिंगला लटकणारा हा पंखा अगदी सिलिंगला जोडलेल्या दांड्यापासून फिरतोय. त्यामुळेच हा पंखा पडेल की काय अशी भीती या रुग्णाला असल्याचे तो व्हिडीओत सांगतो. यासंदर्भात मी डॉक्टरांकडे आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केलीय. पण हा पंखा नीट करण्यात आलेला नाही असं हा रुग्ण सांगतोय. त्याचप्रमाणे या पंख्यामुळे मला रात्रभर झोप येत नसल्याचंही तो सांगताना दिसत आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतली. आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एका टेक्निशियनला घेवून तो पंखा दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्या रुग्णाचा जीव वाचला आहे असेच म्हणावे लागेल.