ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या तयार होणाऱ्या लसीसंदर्भातला अहवाल द लॅन्सेट या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसारित झाला. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी अदर पूनावाला यांनी एक महत्त्वाचा दावा केला होता. सिरमच्या ५० टक्के लसी या भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसंच यासाठी लोकांना कोणतीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा दावा सिरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केला होता. त्यानंतर स्वदेश फाऊंडेशनचे संस्थापन रॉनी स्क्रूवाला यांनी पूनावाला यांना मजेशीर प्रश्न केला होता. “पारसी समुदायाला करोनापासून वाचवण्यासाठी काही विशेष कोटा ठेवला आहे का?,” असा सवाल त्यांनी केला होता. यावर पूनावाला यांनीदेखील मजेशीर उत्तर दिलं आहे.

“आम्ही एका दिवसात एवढ्या लसींची निर्मिती करू की संपूर्ण जगातील पारसी समुदायातील लोकं सुरक्षित होतील,” असं मजेशीर उत्तर अदर पूनावाला यांनी दिलं. यापूर्वी पूनावाला यांनी भारतीयांसाठी ५० टक्के लसी ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच आपल्याला सरकारनं पाठिंबा द्यावा असंही ते म्हणाले होते.

काय म्हणाले होते पूनावाला ?

सिरम इन्स्टीट्यूट ही भारतातली अशी कंपनी आहे जी जगभरातल्या लस उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. सध्याच्या घडीला करोनावर लस शोधण्यासाठीचे विविध प्रयत्न सुरु आहेत. अशात ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट यांच्या साथीने जी लस तयार करण्यात येते आहे त्याचा तिसरा टप्पा बाकी आहे. हा टप्पा भारतात घेतला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जेणेकरुन या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतात करता येईल असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं होतं.

आम्ही सांगितलं की ५० टक्के लसी या भारतीयांसाठी असतील. तर ५० टक्के लसी या इतर देशांसाठी असतील. सरकारने यासंबंधी आम्हाला पाठिंबा द्यावा. करोना है वैश्विक संकट आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सगळ्याच देशांना या लसींची गरज लागणार आहे. भारतासोबतच इतर देशांचीही आपण काळजी घेतली पाहिजे असंही पूनावाला यांनी म्हटलं होतं.