करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी सांगितले. सर्व जनतेने पुढील २१ दिवस घरातच राहावे अशी विनंती मोदींनी देशातील लोकांना केली. दरम्यान, मोदींच्या भाषणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांसह देशातील काही शहरांतील दुकानदारांनी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांमध्ये गर्दी होऊ नये आणि त्यांच्यात ‘सुरक्षित अंतर’ राहावे यासाठी एक जुगाड शोधल्याचं समोर आलंय.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात सामान्यांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी ‘अनोखी’ व्यवस्था केलीये. पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथे भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या लोकांमध्ये ‘सुरक्षित अंतर’ ठेवण्यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरानंतर रिंगण किंवा चौकट आखले आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना त्या चौकटीत उभे राहावे लागते. एकप्रकारे ही ‘मॅन टू मॅन मार्किंग’ करण्यासारखी पद्धत असल्याने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्विटरवर हा फोटोही पोस्ट केलाय.

दुसरीकडे, गुजरातमध्येही काही दुकानदारांनी अशाच प्रकारे जुगाड केल्याचं समोर आलंय. गुजरातच्या पाटणमध्ये हिंगला बाजारात राहणाऱ्या एका किराणा दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर रिंगण आखलेत. असाच प्रकार गुजरातच्या मुंदडा येथील एका दुकानाबाहेरही पाहायला मिळाला. सोशल मीडियावर गुजरातचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर या ‘जुगाड’चे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.