मास्क घाला, हात श्वच्छ धुवा, घराबाहेर पडून नका अशा पद्धतीच्या अनेक सूचना आपल्यापैकी अनेकांनी लॉकडाउनदरम्यान वेगवेगळ्या माध्यमांतून ऐकल्या, वाचल्या आणि पाहिल्या असतील. करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये अशाच प्रकारचे आवाहन तेथील नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र युरोपमधील बेल्जियम देशातील सरकारने तेथील नागरिकांना एक आगळं वेगळं आवाहन केलं आहे. हे आवाहन खाण्यासंदर्भातील आहे. येथील सरकारने देशातील नागरिकांनी लॉकडाउन संपेपर्यंत आठवड्यातून किमान दोन दिवस फक्त बटाट्याच्या फ्राइज खाव्यात असं म्हटलं आहे. सध्या आवाहनाची इंटरनेटवर चांगलीच चर्चा सुरु आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, उद्योगधंदे बंद असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरोपमधील फ्रान्स, स्पेन, इटलीसारख्या देशांबरोबरच बेल्जियममध्येही करोनाचा कहर पहायला मिळत आहे. येथे करोनामुळे आतापर्यंत (३० एप्रिल २०२० दुपारी चारवाजेपर्यंत) ४८ हजार ५०० हून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ७ हजार ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याबरोबरच बेल्जियमसमोर आणखीन एक संकट आहे आणि ते म्हणजे बटाट्यांचे.

बेल्जियममध्ये बाटट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यामुळेच येथील खाद्यसंस्कृतीमध्ये बटाट्याला महत्वाचे स्थान आहे. बटाट्यांचे फ्राइज येथील आहाराचा महत्वाचा भाग आहे. लॉकडाउन सुरु झाल्यामुळे आणि इतर देशांनी आयात बंद केल्यामुळे आता बेल्जियममधेय बटाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक शहरांमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याने तेथून होणारी फ्रोझन पोटॅटोची (थंड तापमानात ठेवण्यात येणारे बटाट्याचे पदार्थ) मागणीही घटली आहे. बेल्जियममधील बटाट्याच्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के बटाटा असे पदार्थ करण्यासाठी वापरण्यात येतो. मात्र सध्या मागणीच नसल्याने मोठ्याप्रमाणात बटाटा पडून आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बट्ट्याची साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीय. बटाटा उत्पादनासंदर्भात काम करणाऱ्या देशातील बेल्गापोम या उद्योजकांच्या गटाचे सरचिटणीस असणाऱ्या रोमन कुल्स यांनी ‘सीएनबीसी’शी बोलताना ही माहिती दिली आहे. मागणी घटल्याने आणि कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात फ्रोझन पोटॅटो पडून असल्याने नवीन समस्या आमच्यासमोर निर्माण झाली आहे असं रोमन यांनी सांगितलं. “माझ्या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच मला बटाट्याचा साठा संपवण्यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागली,” असं रोमन यांनी सांगितल्याचे असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जगभरामध्ये फ्रेंच फ्राइज नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोटॅटो फ्राइजचे जन्मस्थान बेल्जियम असल्याचे सांगितले जाते.

या संटकावर उपाय म्हणून बेल्जियम सरकारने थेट जनतेची मदत घेण्याचे ठरवले आहे. सरकारने देशातील नागरिकांनी आठवड्यातील किमान दोन दिवस फक्त फ्राइज खावेत अशी विनंती केली आहे. यासंदर्भातील औपचारिक आवाहनही करण्यात आल्याचं टाइम डॉट कॉमनं म्हटलं आहे. “आम्ही सध्या सुपरमार्केट्सबरोबर संवाद साधत असून नागरिकांना त्यांच्या घरी फ्राइज पुरवता येतील का यासंदर्भात चर्चा सुरु आहे. लोकांनी आठवड्यातून दोनदा फ्राइझ खालल्या तर त्याचा बराच फायदा होईल. मुळात आम्ही अन्न वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत,” असं रोमन यांनी सांगितलं.

“शेतकऱ्यांनी बटाट्याचे उत्पादन घेऊ नये असं आवाहन आम्ही केलं आहे. या मौसमाबरोबर पुढील मौसमात पुरेल इतका बटाटा सध्या देशात उपलब्ध आहे. बटाट्याचे उपादन थोड्या उशीराने घेण्यासंदर्भात आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे,” असं रोमन यांनी स्पष्ट केलं.