News Flash

झूम कॉलवरच केलं लग्न; पाहुण्यांना आमंत्रण देताना म्हणाले ‘लग्नाला या, पॅण्ट नसली तरी चालेल’

अनेकांनी या लग्नाला झूमवरुनच उपस्थिती लावली

झूम कॉलवरच केलं लग्न

करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. त्यातही अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत ६३ हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्यातही न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये करोनामुळे इतर देशांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. एकंदरितच अमेरिकेमधील परिस्थिती चिंताजनक आहे. असं असतानाच आता न्यूयॉर्कमधूनच एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील एका दांपत्याने चक्क झूम या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपवर पाहुण्यांना आमंत्रित करत त्यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत लग्न केलं आहे.

बझफीडने दिलेल्या वृत्तानुसार मार्क व्हॅन नेम या २८ वर्षीय तरुणाने त्याची २७ वर्षीय प्रेयसी जेन ओरेली हिच्याशी स्वत:च्या न्यूयॉर्कमधील घरातच लग्न केलं. या दोघांनी त्यांच्या जवळच्या लोकांना या लग्नसाठी झूमवरुन उपस्थित राहण्याचे खास आमंत्रण पाठवलं होतं. ठरलेल्या वेळी सर्वांनी झूमवरुन लॉगइन करत लग्नाला उपस्थिती लावली आणि शनिवारी हे दोघे या सर्वांच्या उपस्थिती लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांनी खास आमंत्रण पाठवताना, ‘झूम फॉर्मल्स आणि पॅण्ट नसली तरी चालेल’ असं आपल्या आमंत्रणामध्ये म्हटलं होतं. व्हिडिओ कॉल करताना सामान्यपणे सर्व कपडे बदलण्याऐवजी केवळ शर्ट किंवा टॉप बदलून व्हिडिओ कॉलवरील मिटिंगला हजेरी लावणाऱ्यांना चिमटा काढत या दोघांनी ही विशेष सूट दिली होती.

अगदी थाटामाटामध्ये व्हॅन आणि जेनला लग्न करायचं होतं. वर्षभरापूर्वीच त्यांची एंगेजमेंट झाली असून एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे लग्न होणार होतं. त्यासाठी त्यांनी २०० पाहुण्यांची यादीही बनवून ठेवली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यांना आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. त्यांनी सप्टेंबरमध्ये लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यासंदर्भातील अंतिम निर्णय त्यांनी घेतलेला नाही. दरम्यानच्या काळात १८ एप्रिल रोजी न्यूयॉर्कमध्ये नव्याने लग्न करणाऱ्या जोडप्यांना लग्नाचे प्रमाणपत्र जारी करण्याची सुविधा सुरु करण्यात आली. त्यामुळेच या दोघांनी झूमच्या माध्यमातून पाहुण्यांना आमंत्रित करत घरच्या घरी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आपल्या अंगणामध्येच लग्नाची औपचारिकता पूर्ण करत ‘यस आय डू’ म्हणत लग्न केले. हे लग्न लावणाऱ्या जीमी व्हॅन बार्मर यांनीच या लग्नाचे फोटो आपल्या ट्विटवर पोस्ट केलं आहेत.

या अंगणातील पारंपारिक पद्धतीच्या लग्नानंतर त्यांनी एकमेकांना झूम कॉलच्या माध्यमातून उपस्थित राहिलेल्या त्यांच्या नातेवाईकांसमोर होकार कळवला. या दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाई वेगवेगळ्या ठिकाणांवरुन या लग्नासाठी उपस्थित राहिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 11:41 am

Web Title: coronavirus couple got married on zoom scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘क्वॉड कॅमेरा सेटअप’सह ‘पॉवरफुल’ बॅटरी, Redmi Note 9 झाला लॉन्च
2 Video: १ मे १९६० ला असा साजरा झाला पहिला ‘महाराष्ट्र दिन’; रोषणाई, जल्लोष यात्रा अन् बरचं काही…
3 व्हिडिओ कॉलिंगची ‘डिमांड’ वाढली, आता रिलायन्सने आणलं JioMeet अ‍ॅप
Just Now!
X