चीनमधील वुहान शहरातून उद्भवेला करोनानं जगातील २०४ देशांत आपली पायामुळे रोवली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना व्हायरसला महामारी असे घोषित केलं आहे. करोना विषाणूमुळे आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. त्याचवेळी आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत. याच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी सर्वाजनिक ठिकाणी गर्दी करण्यावर आणि सार्वजनिक वाहतुकीबरोबर मॉल, दुकाने आणि इतर गोष्टी बंद करण्याचा आदेश देश लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमुळे लाखो लोकं घरातच आहेत. असं असलं तरी या लॉकडाउनमुळे काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहे. लॉकडाउनमुळे कंपन्या, उद्योग धंदे, वाहतुक मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याने वायू प्रदुषणामध्ये घट झाली आहे. भारतामध्येही २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर झाल्याचे दिसून येत आहे. याचीच प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

ओदिसामध्ये कार्यरत असणारे सरकारी अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो ट्विट केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा फोटो हिमाचलमधील धौदाधर पर्वतरांगांचा आहे. हा फोटो पंजाबमधील जलंदरमधून काढण्यात आल्याचे सुशांत यांनी म्हटलं आहे. “निसर्ग काय आहे आणि आपण काय करुन ठेवलयं हे या फोटोतून दिसत आहे. हा फोटो आहे हिमालचमधील धौदाधर पर्वतरांगाचा. या पर्वतरांगा पंजाबमधील जलंदरमधून ३० वर्षानंतर दिसत आहेत. मागील ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हवेतील प्रदुषणाचा स्तर इतका कमी झाला आहे. या दोन्ही जागांमधील अंतर अंदाजे २०० किलोमीटर आहे,” असं ट्विट नंदा यांनी केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी हा फोटो मला माझ्या मित्राने पाठवला असून हा खरा आहे का याबद्दल मला ठोसपणे सांगता येणार नाही असंही म्हटलं आहे. तसेच हा फोटो अंशुल चोप्रा यांनी काढल्याचे नंदा यांनी सांगितलं आहे.

नंदा यांच्या या ट्विटला एक हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. तर तीन हजार ७०० हून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. या फोटोची सोशल नेटवर्किंगवर एवढी चर्चा होती की नंदा यांनी ट्विटवमध्ये वापरलेला Dhauladhar हा शब्द शुक्रवारी रात्री ट्विटवरच्या टॉप ट्रेण्डमध्ये होता.