केंद्र सरकारकडून मदत म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपये दिले जाणार असल्याचा एखादा मेसेज तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल नेटवर्किंगवर वाचला असेल तर तो मेसेज खोटा आहे. अशाप्रकारची भारत सरकारची कोणतीही योजना नाहीय. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन यासंदर्भातील मेसेज हे खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या नावाने व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्या, योजना, मंत्रालयांच्या निर्णयासंदर्भातील मेसेजेस याबद्दल लोकांना सावध करण्यासाठी सकरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) हे अकाऊंट सुरु केलं आहे.

केंद्र सरकारने करोना सहाय्यता योजना सुरु केली असून या योजनेअंतर्ग सर्वांना मदत केली जाणार आहे. यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी लिंकवर क्लिक करावे. अर्ज दाखल केल्यावर एक हजार रुपये मदत निधी मिळेल असा दावा या खोट्या व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. यावरच स्पष्टीकरण देताना “केंद्र सरकारने अशी कोणताही योजना सुरु केलेली नाही. या मेसेजमध्ये देण्यात आलेली माहिती आणि लिंक खोटी आहे. कृपया असा मेसेजेसपासून सावध राहा,” असं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे.

तुम्हालाही अशाप्रकारचा कोणताही मेसेज आला तर त्यावर क्लिक करुन आपली खासगी माहिती शेअर करु नका. या माध्यमातून तुम्ही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर खोटे मेसेज व्हायरल होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच १५ ऑक्टोबरपर्यंत हॉटेल, रेस्तराँ, रिसॉर्ट बंद राहणार, तसेच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच च्याडब्ल्यूएचओ नावाने भारतातील लॉकडाउनसंदर्भात प्रोटोकॉल जारी केला आहे असे मेसेज व्हायरल होतं होता. मात्र अशाप्रकारचा कोणताही मेसेज खरा नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केलं होतं.