केरळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या अलप्पुझा जिल्ह्यातील एका गावामधील नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. येथील लोकांनी एकेमकांपासून सुरक्षित अंतर ठेवत सोशल डिस्टन्सींगचा अवलंबं करण्यासाठी चक्क छत्र्यांचा वापर सुरु केला आहे. अलप्पुझामधील गावातील ग्रामपंचायतींने प्रत्येक नागरिकाला छत्रीचे वाटप करण्याचे निर्णय घेतला आहे.

केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ही कल्पना सुचवली होती असं थानीयरमिक्काम या गावातील पंचायतीमधील अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त एनडीटीव्ही डॉटकॉमने दिलं आहे. छत्री उघडून एक व्यक्ती उभा राहिला तर त्याच्या आजूबाजूला म्हणजेच किमान एक मीटर अंतरावर कोणीच येऊ शकत नाही. याच माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं, असं पंचायतीमधील रेमा मदनन यांनी सांगितलं.

“लोकांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे म्हणून अलप्पुझा जिल्ह्यातील थानीयरमिक्काम गावातील ग्रामपंचायतीने घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने छत्री घेऊन घराबाहेर पडणे बंधनकारक केलं आहे. छत्री डोक्यावर धरुन चालणाऱ्या दोन व्यक्तींमधील किमान अंतर एक मीटरचं असतं. सवलतीच्या दरामध्ये गावात छत्र्या वाटप करण्यात आली आहे,” असं ट्विट इसाक यांनी केलं आहे.

गावच्या ग्रामपंचायतीने अत्यावश्यक सेवेत काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि अंगवाडी सेविकांना या छत्र्या मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही वेगवेगळ्या प्रायोजकांच्या मदतीने छत्री वाटपाचे काम करत आहोत. गरिबांना या छत्र्या मोफत देता याव्यात यासाठी आम्ही प्रयोजक शोधत आहोत. तसेच या छत्र्या गावकऱ्यांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य कर्चमाऱ्यांना मोफत छत्री वाटप केले जाणार आहे,” असं मदनन यांनी सांगितलं.

पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलप्पुझा जिल्ह्यामध्ये करोनाचे पाच रुग्ण अढळून आले होते. हे सर्व रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. केरळमध्ये करोनाचे ४६८ रुग्ण (३० एप्रिल २०२० दुपारी तीन वाजेपर्यंत) अढळून आले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.