अमेरिकेबरोबरच युरोपीयन देशांनामध्ये करोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यातही इटली, स्पेनसारख्या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र बुधवारी उपचार घेऊन बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या २ हजार ९०० हून अधिक आहे. त्यामुळेच उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्याने इटलीला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिवसोंदिवस उपचार घेत असणाऱ्यांची संख्या कमी होत असून अनेकजणांना डिस्चार्ज देण्यात येत असल्याने लॉकडाउनसंदर्भातील नियम शिथिल करण्याचा विचार सुरु असल्याचे, एएफपीने या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सध्या इटलीमध्ये लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. ९ मार्च पासून सुरु झालेला इटलीतील लॉकडाउन किमान ४ मे पर्यंत सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हा लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात पंतप्रधान गिसीपी काँटे निर्णय घेणार असल्याचे समजते. सध्या तरी इटलीमधील पोलीस नागरिकांनी घरातच थांबून लॉकडाउनचे पालन करावे यासंदर्भात सर्व प्रयत्न करत आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सींगचा भंग करु नये यासंदर्भातील गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी अगदी ड्रोन्सचाही वापर पोलिसांकडून केला जात आहे. याच पहाणीदरम्यान नुकतीच पोलिसांना एक व्यक्ती समुद्रकिनाऱ्यावर सनबाथ घेताना दिसून आली. ड्रोनने या व्यक्तीला आपल्या कॅमेरामध्ये टिपले तेव्हा निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर ही एकमेव व्यक्ती असल्याचे दिसून आले. या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली असून त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

ड्रोनच्या कॅमेरामध्ये ही व्यक्ती कैद झाल्यानंतर कंट्रोल रुमने तातडीन गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आणि पोलिसांचा संपूर्ण ताफाच या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी दाखल झाला. समुद्रकिनारी गस्त घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्वाड बाईक्सवरुन पोलिसांनी या व्यक्तीला गाठले आणि त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांनीच सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे.

पोलिसांनी शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ड्रोनमधून शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर बाकडा टाकून सनबाथ घेताना दिसत आहे. अचानक तिथे पोलिसांचा ताफा दाखल होतो आणि या व्यक्तीला ताब्यात घेतो. हे दृष्य अगदी एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाणे वाटत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. इटलीच्या इमिलिया-रोमाग्ना प्रदेशामधील रिमिनी या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हा १५ किमी लांबीचा इटलीमधील लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये इटलीत १७ हजार ५०० लोकांवर लॉकडाउनचे नियम मोडल्याप्रकरणी करावाई करण्यात आल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.